Sampurn Haripath in marathi lyrics with audio/music | संपूर्ण हरिपाठ मराठी | वारकरी हरिपाठ | majhi mauli

shreyash feed ads 2

संपूर्ण हरिपाठ मराठी | Sampurn Haripath in marathi lyrics | वारकरी हरिपाठ 

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 

Download Sampurn haripath in marathi  song | music free









सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।

 कर कटेवरी ठेवून या ॥१॥ 

तुळशी हार गळा कासे पितांबर । 

आवडे निरंतर हेचि ध्यान ॥२॥

 मकर कुंडले तळपती श्रवणी ।

 कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥३॥

 तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ।

 पाहीन श्रीमुख आवडीने ॥४॥


॥ श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥


१.  देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।

 तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ 

हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।

पुंण्याची गणना कोण् करी ॥२॥

 असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । 

वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥

 ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । 

द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥



२.  चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण ।

 अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥ 

मंथुनी नवनीता तैसें घे अनंता ।

 वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥

 एक हरि आत्मा जीवशिव सम ।

 वायां तू दुर्गमा न घाली मन ॥३॥ 

ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।

 भरला घनदाट हरि दिसे ॥४॥



३.  त्रिगुण असार निर्गुण हें सार । 

सारासार विचार हरिपाठ ॥१॥

 सगुण निर्गुण गुणाचें अगुण ।

 हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥ 

अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार ।

 जेथुनि चराचर हरिसी भजें ॥३॥ 

ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं ।

 अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥



४.  भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति ।

 बळेंवीण् शक्ति बोलु नये ॥१॥ 

कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित ।

 उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥ 

सायासें करिसी प्रपंच दिननिशीं ।

 हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥

 ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें ।

 तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥



५.   योगयागविधि येणें नोहे सिद्धी ।

 वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥ 

भावेंविण देव न कळे नि:संदेह ।

 गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥ 

तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त ।

 गुजेंविण हित कोण सांगे ॥३॥ 

ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ।

 साधूचे संगती तरणोपाय ॥४॥



६.   साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला ।

 ठायींच मुराला अनुभवें ॥१॥ 

कापुराची वाती उजळली ज्योति ।

 ठायींच समाप्ति झाली जैसी ॥२॥

 मोक्षरेखे आला भाग्यें विनटला ।

 साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥

 ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । 

हरि दिसे जनीं वनी आत्मतत्वीं ॥४॥



७.  पर्वताप्रमाणे पातक करणें । 

वज्रलेप होणें अभक्तासी ॥१॥ 

नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त ।

 हरिसी न भजत दैवहत ॥२॥

 अनंत वाचाळ बरळती बरळ ।

 त्यां कैंचा दयाळ पावे हरि ॥३॥

 ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान ।

 सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥



८.   संतांचे संगतीं मनोमार्ग गति ।

 आकळावा श्रीपति येणें पंथें ॥१॥

 रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा ।

 आत्मा जो शिवाचा राम जप ॥२॥

 एकतत्व नाम साधिती साधन ।

 द्वैताचें बंधन न बाधिजे ॥३॥

 नामामृत गोडी वैष्णवां लाधली ।

 योगियां साधली जीवनकळा ॥४॥ 

सत्वर उच्चार प्रल्हादीं बिंबला ।

 उद्धवा लाधला कृष्णदाता ॥५॥

 ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ ।

 सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥६॥



९.   विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान ।

 रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥

 उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा ।

 रामकृष्णीं पैठा कैसेनी होय ॥२॥

 द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान ।

 तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥ 

ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान । 

नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥



भजन : रामकृष्णाहरी । जय जय रामकृष्णाहरी ।।


१०.   त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी । 

चित्त नाहीं नामीं तरी तें व्यर्थ ॥१॥

 नामासी विन्मुख तो नर पापिया ।

 हरिवीण धांवया न पावे कोणी ॥२॥ 

पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मीक । 

नामें तीन्ही लोक उद्धरती ॥३॥ 

ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचें ।

 परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥४॥



११.   हरि उच्चारणीं अनंत पापराशी ।

 जातील लयासी क्षणमात्रे ॥१॥

 तृण अग्निमेळें समरस झालें ।

 तैसें नामें केलें जपतां हरि ॥२॥ 

हरि उच्चारण मंत्र पै अगाध । 

पळे भूतबाधा भेणे तेथें ॥३॥ 

ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।

 न करवे अर्थ उपनिषदां ॥४॥



१२.  तीर्थ व्रत नेम भावेंविण सिद्धि । 

वायांचि उपाधि करिसी जनां ॥१॥ 

भावबळें आकळे येऱ्हवीं नाकळे । 

करतळीं आंवळे तैसा हरि ॥२॥

 पारियाचा रवा घेतां भूमिवरी ।

 यत्न परोपरी साधन तैसें ॥३॥ 

ज्ञानदेव म्हणे निवृत्ति निर्गुण । 

दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥४॥



१३.  समाधि हरिची सम सुखेंवीण ।

 न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥१॥

 बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें ।

 एका केशवराजें सकळ सिद्धि ॥२॥

 ऋद्धि सिद्धि निधी अवघीच उपाधि । 

जंव त्या परमानंदीं मन नाहीं ॥३॥ 

ज्ञानदेवी रम्य रमलें समाधान ।

 हरिचें चिंतन सर्वकाळ ॥४॥



१४.  नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी ।

 कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥

 रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप ।

 पापाचे कळप पळती पुढें ॥२॥

 हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । 

म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥ 

ज्ञानदेवा पाठ नारायण नाम ।

 पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥



१५.  एक नाम हरि द्वैतनाम दुरी ।

 अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥

 समबुद्धि घेतां समान श्रीहरि ।

 शमदमांवरी हरि झाला ॥२॥ 

सर्वांघटीं राम देहांदेहीं एक ।

 सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥ 

ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा ।

 मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥४||



१६.   हरिनाम जपे तो नर दुर्लभ । 

वाचेसी सुलभ रामकृष्ण ॥१॥

 राम कृष्ण नामीं उन्मनी साधली । 

तयासी लाधली सकळ सिद्धी ॥२॥

 सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठीं आले ।

 प्रपंची निवाले साधुसंगे ॥३॥

 ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा । 

येणें दशदिशा आत्माराम ॥४॥



१७.  हरिपाठकीर्ति मुखें जरी गाय ।

 पवित्रचि होय देह त्याचा ॥१॥ 

तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप ।

 चिरंजीव कल्पकोटि वैकुंठीं नांदे ॥२॥

 मातृपितृभ्राता सगोत्र अपार ।

 चतुर्भुज नर हो‌ऊनि ठेले ॥३॥

 ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधलें ।

 निवृत्तीनें दिधले माझे हातीं ॥४॥



१८.  हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन । 

हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥

 त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें ।

 सकळ घडलें तीर्थाटन ॥२॥ 

मनोमार्गें गेला तो तेथे मुकला । 

हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥ 

ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी ।

 रामकृष्णीं आवडि सर्वकाळ ॥४॥



भजन : विठोबा रखुमाई । जय जय विठोबा रखुमाई ।।



१९.  नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी ।

 पापे अनंत कोटी गेली त्यांची ॥१॥

 अनंत जन्मांचे तप एक नाम । 

सुगम हरिपाठ ॥२॥ 

योग याग क्रिया धर्माधर्म माया ।

 गेले ते विलया हरिपाठीं ॥३॥

 ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म । 

हरिविण नेम नाहीं दुजा ॥४॥



२०.  वेदशास्त्रपुराण श्रुतिचे वचन ।

 एक नारायण सार जप ॥१॥

 जप तप कर्म हरिविण धर्म । 

वा‌उगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥

 हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले ।

 भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥ 

ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र । 

यमें कुळगोत्र वर्जियेले ॥४||



२१.   काळ वेळ नाम उच्चारितां नाही ।

 दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥१॥ 

रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण ।

 जडजीवां तारण हरि एक ॥२॥

 हरिनाम सार जिव्हा या नामाची । 

उपमा त्या देवाची कोण वानी ॥३॥

 ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ ।

 पूर्वजां वैकुंठ-मार्ग सोपा ॥४॥



२२.   नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ ।

 लक्ष्मीवल्लभ तयां जवळी ॥१॥ 

नारायण हरि नारायण हरि । 

भुक्ति मुक्ति चारी घरीं त्यांच्या ॥२॥

 हरिविण जन्म तो नरकचि पैं जाणा । 

यमाचा पाहुणा प्राणि होय ॥३॥

 ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड । 

गगनाहुनि वाड नाम आहे ॥४॥



२३.   सात पांच तीन दशकांचा मेळा ।

 एक तत्त्वीं कळा दावी हरि ॥१॥ 

तैसें नव्हे नाम सर्वत्र वरीष्ठ । 

तेथें कांहीं कष्ट न लागती ॥२॥ 

अजपा जपणें उलट प्राणाचा । 

तेथेंहि मनाचा निर्धार असे ॥३॥

 ज्ञानदेवा जिणें नामेंविण व्यर्थ । 

रामकृष्णीं पंथ क्रमियेला ॥४॥



२४.   जप तप कर्म क्रिया नेम धर्म ।

 सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥१॥

 न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । 

रामकृष्ण टाहो नित्य फोडी ॥२॥

 जाति वित्त गोत कुलशील मात ।

 भजकां त्वरीत भावयुक्त ॥३॥

 ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं ।

 वैकुंठभुवनी घर केलें ॥४॥



२५.   जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं ।

 हरि‌उच्चारणीं पाही मोक्ष सदां ॥१॥

 नारायण हरि उच्चार नामाचा । 

तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥२॥

 तेथील प्रमाण नेणवें वेदांसी ।

 तें जीवजंतूंसी केंवी कळे ॥३॥ 

ज्ञानदेवा फळ नारायण पाठ ।

 सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥



२६.   एक तत्व नाम दृढ धरीं मना ।

 हरीसी करुणा ये‌ईल तुझी ॥१॥

 तें नाम सोपें रे राम-कृष्ण गोविंद ।

 वाचेसी सद्गद जपा आधीं ॥२॥

 नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा । 

वायां आणिका पंथा जाशील झणीं ॥३॥

 ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी ।

 धरोनी श्रीहरि जपे सदां ॥४॥



२७.   सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी ।

 रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥ 

लटिका व्यवहार सर्व हा संसार । 

वायां येरझार हरिवीण ॥२॥

 नाम मंत्र जप कोटी जा‌ईल पाप ।

 रामकृष्णीं संकल्प धरुनि राहें ॥३॥

 निजवृत्ति हे काढी सर्व माया तोडी ।

 इंद्रियां सवडी लपू नको ॥४॥ 

तीर्थी व्रतीं भाव धरी रे करुणा ।

 शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥

 ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान ।

 समाधि संजीवन हरिपाठ ॥६॥



२८.  नामसंकीर्तन साधन पैं सोपें ।

जळतील पापें जन्मांतरी ।।१।।

न लागती सायास जावें वनांतर ।

सुखें येतो घरा नारायण ।।२।।

ठायीचं बैसोनि करा एक चित्त ।

आवडी अनंत आळवावा ।।३।।

रामकृष्णहरी विठ्ठल केशवा ।

मंत्र हा जपावा सर्वकाळ ।।४।।

यावीण असतां आणिक साधन ।

वाहातसें आण विठोबाची ।।५।।

तुका म्हणे सोपें आहे सर्वाहूनी ।

शहाणा तो धणी घेतो येथें ।।६।।



१. देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी ।

तेणें मुक्ति चारी साधियेल्या ।।१।।

हरी मुखें म्हणा हरि मुखें म्हणा ।

पुण्याची गणना कोण करी ।।२।।

असोनि संसारीं जिव्हे वेगु करीं ।

वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ।।३।।

ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा ।

द्वारकेचा राणा पांडवा घरीं ।।४।।


भजन : ज्ञानेश्वर माऊली | ज्ञानराज माऊली तुकाराम ||





 = गुरुपरंपरेचे अभंग =






१. सत्यागुरुरायेन कृपा मज केली ।

परि नाहीं घडली सेवा कांही ।।१।।

सांपडविलें वांटे जातां गंगास्नान ।

मस्तको तो जाणा ठेविला कर ।।२।।

भोजन मागती तूप पावशेर ।

पडिला विसर स्वप्नामाजीं ।।३।।

काय कळे उपजला अंतराय ।

म्हणोनियां काय त्वरा झाली ।।४।।

राघव चैतन्य केशव चैतन्य ।

सांगितली खूण मालिकेची ।।५।।

बाबाजी आपुलें सांगितलें नाम ।

मंत्र दिला रामकृष्णहरी ।।६।।

माघ शुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । 

केला अंगीकार तुका म्हणे ।।७।।




२. माझियें मनींचा जाणोनियां भाव ।

तो करी उपाव गुरुराव ।।१।।

आवडीचा मंत्र सांगितला सोपा ।

जेणें नोहे गुंफा कोठें काहीं ।।२।।

जाती पुढें एक उतरले पर ।

हा भवसागर साधुसंत ।।३।।

जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी ।

उतार सांगडी तापे पेटे ।।४।।

तुका म्हणे संती दाखवीला तारू ।

कृपेचा सागर पांडुरंग ।।५।।



३. घालुनिया भर राहिलों निश्चिंती ।

निरविले संतीं विठोबासी ।।१।।

लाऊनियां हात कुरवाळीला माथा ।

सांगितली चिंता न करावी ।।२।।

कटीकर समचरण साजिरे ।

राहिला भीवरे तीरिं उभा ।।३।।

खुंटले सायास आणिक या जीव ।

धरिले केशवा पाय तुझे ।।४।।

तुज वाटे आतां टेन करिन अनंता ।

तुका म्हणे संता लाज माझी ।।५।। 


  

४. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव ।

आपणचि देव होय गुरु ।।१।।

पढिये देहभाव पुरवीं वासना ।

अंतीं तें आपणापाशी न्यावें ।।२।।

मागें पुढें उभा राहे सांभाळीत ।

आलीया आघात निवाराया ।।३।।

योग क्षेम त्याची जाणें जडभारी ।

वाट  दावी करीं धरुनियां ।।४।।

तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं ।

पाहावें पुराणीं विचारूनि ।।५।।



५.  आदिनाथ उमा बीज प्रगटले ।

 मच्छिंद्रा लाधले सहजस्थिति ।। १ ।।

तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिधली ।

 पूर्ण कृपा केली गहिणींनाथा ।। २ ।।

वैराग्ये तापला सप्रेमे निमाला ।

 ठेंवा जो लाधला शांती सुख ।। ३ ।।

निर्द्वंद्व निसंक विचारता मही ।

 सुखानंद र्‍हदयि स्थिरावला ।। ४ ।।

विरक्तीचे पात्र अन्वयाचे मुख ।

 येउनि सम्यक अनन्यता ।। ५ ।।

निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण ।

 कुळ हे पावन कृष्ण नामे ।। ६ ।।




६.  आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा । 

मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।। १ ।।

मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला । 

गोरक्ष ओळला गहिणीप्रति ।। २ ।।

गहिनी प्रसादे निवृत्ती दातार । 

ज्ञानदेवा सार चोजविले ।। ३ ।।




 
७.   अवघेचि त्र्येलोक्य आनंदाचे आता ।

 चरणी जगन्नाथा चित्त ठेले ।। १ ।।

माय जगन्नाथ बाप जगन्नाथ ।

 अनाथाचा नाथ जनार्दन ।। २ ।।

एका जनार्दनी एकपणे उभा । 

चैतन्याची शोभा शोभतसे ।। ३ ।।




८.  अवघाचि-संसार सुखाचा-करीन ।

 आनंदे-भरीन तिन्ही-लोक ।।१।।

जाईन गे माये तया पंढरपुरा ।

 भेटेन माहेरा आपुलिया ।।२।।

सर्व सुकृताचे फळ नि लाहीन ।

 क्षेम मी देईन पांडुरंग ।।३।।

बाप रखुमादेवीवरु विट्ठलाची भेटी ।

 आपुल्या सेवेसाठी करुनि ठेला ।।४।।



भजन : ज्ञानेश्वर माऊली | ज्ञानराज माऊली तुकाराम ||


 विनंतीचे अभंग || Vinantiche abhang





1.  कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । 

हेचि कृपादान तुमचे मज ।।१।।

आठवण-तुम्ही द्यावी-पांडुरंगा ।

 कीव-माझी सांगा-काकुलती ।।२।।

अनाथ अपराधी पतीत आगळा ।

 परी पायावेगळा नका करू ।।३।।

तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी ।

 मग मज हरी उपेक्षिणा ।।४।।



2.  बोलिले लेकुरे । 

वेडी वाकुडी उत्तरे ।। १ ।।

करा क्षमा अपराध । 

महाराज तुम्ही सिद्ध ।। २ ।।

नाही विचारला । 

अधिकार म्या आपुला ।। ३ ।।

तुका म्हणे ज्ञानेश्वरा ।

 राखा पाया पै किंकरा ।। ४ ।।



3.  झाले समाधान ।

 तुमचे देखिले चरण ।। १ ।।

आता ऊठावेसे मना । 

येत नाही नारायणा ।। २ ।।

सुरवाडीकपणे । 

येथे सापडले केणे ।। ३ ।।

तुका म्हणे भोग l 

गेला निवारला लाग ।। ४ ।।



4.  करुणी आरती । 

चक्रपाणी ओवाळीती ।। १ ।।

आजी पुरले नवस । 

धन्य काळ हा दिवस ।। २ ।।

पहा ओ सकळा । 

पुण्यवंता तुम्ही बाळा ।। ३ ।।

तुका वाहे टाळी ।

 उभा सन्निध जवळी ।। ४ ।।



5.  प्रेम सप्रेम आरती । 

गोविंदाते ओवाळीती ।। १ ।।

धन्य धन्य ते लोचन ।

 नित्य करिती अवलोकन ।। २ ।।

बाळा पौढा आणि मुग्धा । 

ओवाळिती परमानंदा ।। ३ ।।

नामा म्हणे केशवाते ।

 देखोनि राहिलो तटस्थे ।। ४ ।।



प्रार्थना । मंगलाचरण तिसरे  | Prarthana | Mangalcharan Tisare




श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा|

जगव्यापका जनार्दना, आनंदघना अविनाशा || १ ||


सकल देवाधिदेवा, कृपाळुवा जी केशवा|

महानंदा महानुभवा, सदाशिवा सहजरूपा || २ ||


चक्रधरा विश्वम्भरा, गरुडध्वजा करुणाकरा|

सहस्त्रपादा सहस्त्रकरा, क्षीरसागरा शेषशयना || ३ ||


कमलनयना कमलापती, कामिनीमोहना मदनमूर्ती|

भवतारका धरी त्या क्षिती, वामनमूर्ती त्रिविक्रमा || ४ ||


अगा ये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना|

वासुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा || ५ ||


तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी

हेची करीतसे विनवणी, भवबंधनी सोडवावे || ६ ||




जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर नक्की कंमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि आपल्याकडे काही प्रश्न असल्यास, कृपया comment मध्ये आम्हाला कळवा.

धन्यवाद !



Whatsapp  ग्रुप मध्ये सहभागी व्हा 👉🏻Join






FAIR-USE COPYRIGHT DISCLAIMER


Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.