संत समाधी सोहळा ( संत ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, निवृत्तिनाथ, तुकाराम म. ) bhajani malika ( mauli majhi )

shreyash feed ads 2

]] हरिः  ॐ [[

]] श्री विठ्ठल रुक्मिणी प्रसज्ञ [[

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 

 संत समाधी सोहळा ( संत ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, निवृत्तिनाथ, तुकाराम म. ) 

संपूर्ण  वारकरी भजनी मालिका ( संत समाधी सोहळा ) | Varkari Bhajani Malika ( Sant Samadhi sohala ) 



***।। भजनी मालिका ।। ***

  

||~=~ मालिका पंधरावी ~=~||

( Malika Pandharavi )

...... संत समाधी सोहळा ...... 

( Sant Samadhi Sohala )

श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा 

( Shree sant Dnyaneshwar Maharaj Samadhi Sohala )


            ३८७.पंढरीचा पोहा आला अलंकापुरी । पंच कोसावरी साधुजन ॥१ ॥ पांडुरंगा संगे वैष्णवांचे भार । दिंड्या ते बाहेर निघाल्यासे ॥२ ॥ पताकांचे भार निघालें बाहेर । भेटती ऋषीश्वर पांडुरंगा ॥३ ॥ अवघिया भेटी झाल्या त्या बाहेरी । मग अलंकापुरी येते झाले ॥४ ॥ सोपानाने मग केला नमस्कार । उतरिले पार पांडुरंगा ॥५ ॥


             ३८८. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार । धन्य ज्ञानेश्वर पूण्यभूमी ॥१ ॥ धन्य भागिरथी मनकर्णिका वोघा । आणिक हो गंगा त्रिवेणी त्या ॥२ ॥ धन्य ऋषीश्वर धन्य पांडुरंग । मिळाले ते सांग अलंकापुरी ॥३ ॥ नामाम्हणे धन्य भाग्यचे हे संत । झाला पहा एकांत ज्ञानोबाचा ॥४ ॥ 


            ३८९ . हस्त ठेवि माथया । ज्ञानदेव लागे पायां । विठोजी म्हणे लवलाह्या । समाधीस बसावें ॥ १ ॥ इद्र चंद्र देव येती । ब्रह्मादिक गीतें गाती । यम वरूण बृहस्पती । विमाने दाटती अंतरिक्षी ॥ २॥ तंव पातले गरुडदेव । रूक्मिणी सत्यभामा भाव । राही माता गोपी सर्व । समाधि ज्ञानदेव पहावया ।। ३ ।। ब्रह्मा इंद्र प्रजापती । सर्व अंतरिक्षी पाहाती । अलंकापुरी ये श्रीपती । हरूप चित्तीं ज्ञानदेवा ।। ४ ।। ऋषिमुनी गणगंधर्व पिशाच गुह्यक सर्व । ध्रुव अंबऋषि माधव । चित्तीं भाव पहावया ॥ ५॥ ऐसी दाटली विमानें । हे संती जाणितलें ज्ञानें । ज्ञानदेवी ब्रह्म होणें । हे विंदान विठ्ठलाचें ।। ६ ।। जयजय शब्दें ध्वनी गर्जे । तेणें स्वर्ग मृत्यू पाताळ गाजे । पातळीं शेष म्हणे भुंजे । प्रेमें फुजे न समाये ।। ७ ।। नामा म्हणे शिवादिक । सिद्धेश्वरी मिळाले सकळिका पाहती विठ्ठल कौतुक । ज्ञानदेव समाधीचें ।। ८ ॥ 


            ३९० . पुसताती संत सांग देवा माते । पूर्वी येथे होते कोण क्षेत्र ॥१ ।। देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादी । येथेच समाधि ज्ञानदेवा ॥२ ॥ अष्टोत्तरशें वेळां साधिली समाधी । ऐसे हे अनादी ठाव असे ॥३ ॥ नामा म्हणे देवा सांगितले उत्तम । ज्ञानअंजन सुगम देखो डोळां ॥४ ॥ 


            ३९१ . साडेतीन पाउले टाकिली निश्चळ । नेमियेले स्थळ उत्तरायणी ॥१ ॥ देव म्हणे ज्ञाना होई समाधान । माग वरदान मज कांहीं ॥२ ।। ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिक मासी । व्रत एकादशी स्वामीकडे ॥३ ।। कृष्णपक्षी व्रत हरिदीन परिपूर्ण । मागितला दान ज्ञानदेवे ।।४ ।। नामा म्हणे देवा आवडीने देता । जोडले हे संतां पीयूष जें ॥५ ॥ 


            ३९२ . दशमीचे दिवशी केली प्रदक्षिणा । केला हरिजागर । हरिदीनी थोर कृष्णपक्षी ॥२ ॥ मग केले स्नान भगिरथीचे तीरी । संत महंत भारी पूजियेले ॥अवलोकिले डोळां अंतर बाहेरी । मग सिद्धेश्वरी येते झाले ॥४ ॥ सिद्धेश्वरालागी पूजिलें निवळ । मागितले स्थळ समाधीसी ॥५ ॥ गंगा आणि गिरजा निळकंठ ईश्वर । केला नमस्कार नामा म्हणे ॥६ ॥


             ३९३ . अष्टोत्तरशे वेळ समाधी निशळ । पूर्वी तुझे स्थळ वहनाखाली ॥१ ॥ उठविला नंदी शिवाचा ढवळा । उघडिली शिळा विवराची ॥२ ।। आसन आणि धुनी मृगछालावर । पाहाती ऋषेश्वर वोसंडोनी ॥३ ॥ बा माझी समाधी पाहिली जुनाट । केवळ वैकुंठ गुह्यगौप्य ॥४ ॥ नामा म्हणे देवा पुरातन स्थान । ऐसे नारायणे दावियेले ॥५ ॥ 


३९४ . नारा विठा गोंदा महादा पाठविला । झाडविली जागा समाधीची ॥१ ॥ हरिदीनी जागर केला निशीदीनी । उदईक पारणी द्वादशीची ॥२ ॥ गंगा गिरजा राही रुक्माबाई भामा । उठिल्या रांधण्या पारण्याच्या ॥३ ॥ नाना प्रकारचे पाक ते अपार । मुनि ऋषेश्वर बोलाविले ॥४ ॥ वैष्णव देव आणि आले सुरगण । करोनियां स्नान इंद्रायणी ॥५ ॥ पिंपळाचे पारी बैसविल्या पंक्ती । पात्रे ते श्रीपती वाढू लागे ॥६ ॥ नामा म्हणे देवा करणे साहित्यासी । येतो कासाविसी प्राण माझा।।७ ।।


             ३९५ . देव निवृतियांनी धरिलें दोन्ही कर । जातो ज्ञानेश्वर बैसावया।।१ ।। नदीचिया माशा घातलें माजवण । तैसें जनवन कालवलें ॥२ ॥ दाही दिशा धुंद उदयास्तावीण । तैसेंचि गगण कालवलें ॥३ ॥ जाऊनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरी । पुढे ज्ञानेश्वरी ठेवियेली ॥४ ॥ ज्ञानदेव म्हणे सुखीं केलें देवा । पादपी ठेवा निरंतर ॥५ ॥ तीन वेळा तेव्हा जोडिलें करकमळ । झांकियेलें डोळे ज्ञानदेवें ॥६ ॥ भीममुद्रा डोळा निरंजन मैदान । झाले ब्रह्म पूर्ण ज्ञानदेव ॥७ ॥ नामा म्हणे आतां लोपला दिनकर । बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ॥८ ॥ 


            ३९६ . निवृत्तीने बाहेर आणिलें गोपाळा । घातियेली शिळा समाधीसी ॥१ ॥ सोपान मुक्ताई सांडिती शरीरा । म्हणती धरा धरा निवृत्तीसी ॥२ ॥ आणिकांची तेथें उद्विग्न ती मनें । घालिताती सुमनें समाधीसी ॥३ ॥ नामदेवें भावें केली असे पूजा । बापा ज्ञानराजा पुण्यपुरुषा ॥४ ॥ 


            ३९७ . देवी म्हणती रूक्मिणी । हा एकचि योगी देखिला नयनीं । हाचि ज्ञान संजीवनी । जाण त्रैलोक्यासी ॥ १॥ धन्य धन्य घरातलीं । जो या दृष्टी न्याहाळीं । तो वाहात येईल टाळी । वैकुंठभुवनासी ॥२ ॥ जो याची करील यात्रा । तो तारील सकळ गोत्रा । सकळ कुळ पवित्रा । याचेनि दर्शनें होती ॥ ३ ॥ अलंकापुरी हे शिवपीठ । पूर्वी येथे होते नीलकंठ । सोहळा  ब्रह्मादिक तप वरिष्ठ । येथेंचि पैं केलें ॥ ४॥ इंद्र येऊनियां भूमीसी । याग संपादिलें अहर्निशी । इंद्रायणी इंदोरिसी पंचक्रोशी या पासुनी ॥ ५॥ येथें त्रिवेणी गुप्त असे भैरवापासुनी भागीरथी वसे । पूर्व वटि माया दिसे । ते प्रत्यक्ष जाणा पार्वती ॥ ६॥ भोंवतीं वनवल्ली वृक्षीं । येथे देव येऊनी होती पक्षी । हे असे नित्य साक्षी । अस्थी नासती उदकीं ।। ७॥ पंढरीहूनी हे सोपें । जनाची हरावया पापें । कळिकाळ कोपलिया कोपें । न चले त्याचे अलंकापुरीसी ॥ ८॥ ऐसें सांगतां हरिसी । प्रेम ओसंडले रूक्मिणीसी । म्हणे धन्य धन्य जयाची कुसी । ज्ञानदेव जन्मले ।। ९ ।। नामा म्हणे माझा स्वामी । वसे संतसमागमीं । ऐसें सांगितलें ग्रामी । अलंकापुरीसी ।। १० ॥ 


             ३९८. समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर । उठविले भार वैष्णवांचे ॥१ ॥ अलंकापुरी सव्य घेतली ते संती । दिली भागीरथी ज्ञानालागी ॥२ ॥ भैरवापासूनि उगम निरंतर । रानोमाळ झरे तीर्थगंगा ॥३ ॥ सैंध - इंद्रायणी वाहाती मिळोनी । अखंड क्षणी वोघ जाती ॥४ ॥ चालिले विमान गंधर्व सुरगण । यात्रा परिपूर्ण झाली म्हणती ॥५ ॥ तीर्थ महोत्साह झाला म्हणती सारासार । देव ऋषीश्वर परतले ॥६ ॥ वैष्णवांचे भार निघाले बाहेर । केला जयजयकार सर्वत्रांनी ॥७ ॥ पंढरीचा पोहा निघाला बाहेर । गरुडावरी स्वार देव झाले ॥८ ॥ नामा म्हणे ऐसा सुखी ज्ञानेश्वर । झाला असे स्थीर ब्रह्मबोधे ।।९।।


((( श्री सोपानदेव महाराज समाधी  सोहळा )))

( Shree Sopandev Maharaj Samadhi Sohala )

            ३९९ . धन्य कन्हेचे पाठारी । इंद्रनीळ पर्वत महागिरी । जैसे अलंकापुरी । तैसे पुण्य क्षेत्र हे ॥१ ॥ ऐसे अनुमानिले स्थळ । पूर्वापार निर्मळ । सिद्धी पाववी आळ । माय बापा ॥२ ॥ मग सुमुहूर्त अमृतयोग । सिद्ध संकेत ज्ञानमार्ग । पहिला चंद्र स्वांग । गमन केले योगिराजे ।।३ ।। निवृत्ती सोपान मुक्ताई । अलंकापुरीहूनी आले पाही । मृदंग वाजती घाई । कीर्तन नवाई काय सांगू ॥४ || समाधि सावधान । सुखी  ज्ञानेश्वर निधान । झाला पां स्थिर सोपान । भेटीलागी ॥५ ॥ केले समाधीस नमन । विज्ञापिले सर्वजन ।  करा आमची बोळवण । शेवटीची।।६ ।। 


            ४००. देव म्हणे नाम्या मार्गशीर्ष गाढा । जावे सासवडा उत्सवासी।।१ ।। सोपानासी आम्ही दिधले वचन । चला अवघेजन समुदाय ॥२ ।। अलंकापुरीसी यात्रा केली सांग । मग पांडुरंग सिद्ध झाले ।।३ ।। दुरोनी पताका दिसती मनोहर । उठावले भार वैष्णवांचे ॥४ ॥ निवृत्ती मुक्ताई घेतला सोपान । जातो नारायण कन्हेतीरी ॥५ ॥ नामा म्हणे देवं गंधर्व सुरगण । चालिले सोपान समाधीसी ॥६ ॥ 


            ४०१. भक्तांचे ते साह्य करणे पांडुरंगा । म्हणोनि तीर्थ गंगा उगविले ॥१ ॥ जान्हवी मंदाकीनी भोगावती मिळुनी । दुजी हे त्रिवेणी या भूमीसी ॥२ ॥ निर्झर जीवन वाहती निरंतर । तेथे वटेश्वर उतरले ॥३ ॥ दुरोनि हे स्थळ दिसे मनोहर । उतरले भार वैष्णवांचे ॥४ ॥ नामा म्हणे देवा स्थळ आदी हे अनादि । येथेचि समाधी सोपानासी ॥५ ॥ 

            ४०२. भोगावती तीरी दिधला मंडप । साधु आपरुप पांडुरंग ॥१ ॥ रखुमाई राही बसल्या अनेका सखा पांडुरंग उतरला ॥२ ॥ वद्य मार्गशीर्ष दशमी जागर । हरिदिनी गजर कीर्तनाचा ॥३ ॥ क्षेत्रप्रदक्षिणा केली असे संती । आले भोगावती अवघेजण || ४ || निवृत्ति मुक्ताई दुशित्त अंत : करण । साहित्य नारायण करितसे ॥५ ॥ नामा म्हणे देवा आधी नेमा स्थळ । मग हे सकळ साहित्य करू ॥६ ॥


             ४०३. वटेश्वरे वृत्तांत सांगीतला सकळ । पूर्वी आमचे स्थळ याची क्षेत्री ॥१ ॥ येथूनियां वाट जातसे पाताळा । उघडीले शिळा समाधीची।।२ ।। आसन मनोहर मृगछालावर । पहाती ऋषेश्वर आनंदाने ॥३ ॥ सोपान वटेश्वर करिती एकांत । कळले मनोगत नामा म्हणे ॥४ ॥ 


            ४०४. सोपान वटेश्वर उभे ठेले पुढती । पंचारत्या  होती आनंदाच्या॥शा गंध आणि अक्षता वाहियेल्या सहजा देव निवृत्तिराज पूजियेले ॥२ || धूप आणि दीप आणिले संपूर्ण । पूजिले गगन सोपानाने || ३ || दाही दिशा दृष्टि अवलोकिली सारी । गगन अंकुरी डवरिले ॥४ ॥ चक्र साकार वीजा लखलखती । ज्योति प्रकाशती रानोमाळ || ५ || नामा म्हणे देवा उदय झाला सकळा । सोपानदेवे मूळ दाखविलेवा ॥५ ||


             ४०५. पांडुरंग म्हणे सख्या निवृत्तिराजा । झाडा आतां शेजा समाधीच्या ॥शा नारा विठा महादा पाठविला गोंदा । झाडावया जागा समाधीच्या ॥२ ॥ परिसा भागवत चांगदेव हाते । आणिले साहित्य समाधीचे ॥३ || तुळसी बुका बेल दर्भ आणि फुले । उदक चांगले भोगावतीचे ॥४ ॥ भस्म पितांबर भगवी ती वस्त्रे । योगी दिगंबर समागमे ॥५ || नामा म्हणे देवा उठवा ऋषेश्वर । होईल उशीर समाधीसी ॥६ ॥ 


            ४०६. सोपानदेवे ग्रंथ केला होता सार । ठेविला समोर निवृत्तिच्या ॥१ ॥ सर्वे मुक्ताबाई सद्गुरु निवृत्ती । लक्ष्मीचा पती घेतियेला ।।2।। जयजयकार ध्वनि होताती अपार । जाती योगेश्वर समाधीसी ॥३ ॥ राही रखुमाई नीळकंठ जवळी।समाधीच्या पाळी अवघेजण || ४ || समाधि पायरीवरी वटेश्वर सोपान । मागितला मान पांडुरंगा।।५।।प्रतिवर्षी भेटी देऊ उभयतां।अलंकापुरी जाता उत्सवासी || ६ || नामा म्हणे देवा कृपा केली फार । दिधला की वर भक्तराजा।।७ ।।


            ४०७. निवृत्ती मुक्ताईने धरियेले मौन । वटेश्वर सोपान त्यागियेला ॥१ ॥ समाधि पताकांची पडली सावली । उतरले खाली योगीराज ॥२ ॥ पांडुरंगासंगे गेले ऋषेश्वर । सोपान वटेश्वर । सोपन वटेश्वरा बसविले 1॥३ ॥ शिवाचा अवतार सद्गुरु निवृत्ति । मुक्ताबाई सखी तुह्यापाशी ॥४ ॥ अंतरीचे जाणता बा पंढरीनाथ । आले अश्रुपात सोपानासी ।।५ ।। सोपानाची बोळवण करितसे हरी । दीर्घध्वनी करी नामदेव।।६ ।। 


            ४०८ . धूप आणि दीप उजळिल्या ज्योति । । तेव्हा ओसंडती अवघे जन ॥१ ॥ सोपान वटेश्वरे केला नमस्कार । उतरले पार भवसिंधू।।२ ।। घेतियेले तीर्थ तंव झाले विकळा झांकियेले डोळे ब्रह्मबोधे ॥३ ॥ निवृत्ति मुक्ताई राहिली बाहेरी । आतां तुम्ही हरी सांभाळावे ॥४ ॥ देव ऋषेश्वर निघाले बाहेर । केला नमस्कार नामदेवे ॥५ ॥


             ४०९ . जयजयकारे टाळी पिटली सकळा । घातियेली शिळा समाधीसी ॥१ ॥ निवृत्ति मुक्ताईने घातियेली घोन । करितो समाधान पांडुरंग ॥२ ॥ सोपान वटेश्वर सुखधामी शेजा । करिताती पूजा समाधीची ॥३ ॥ खेद दुःख झाले अवघ्या साधुजनां । केली प्रदक्षिणा समाधीसी ॥४ ॥ निवृत्ति मुक्ताबाई वंदिली समाधी । देहभान शुद्धि हारपली ॥५ ॥ नामा म्हणे देवा उठा अवघेजण । करुं आचमन भोगावती ॥६ ॥


*** श्री संत मुक्ताबाई निजधाम ***

( Shree Sant Muktabai Nijadham )

            ४१०. तापीचिये तीरी महत् ग्राम थोर । असे सोमेश्वर पुरातन ॥ वद्य वैशाख मास दशमी निर्मळ । उष्णकाळ फार तापतसे ॥२ ॥ तेथे परशुरामे मारियेला बाणापाहती पुरातन पश्चिमेस।।३ ॥ पाहिले माय आह्मी मा तापीतीराउतरले भार वैष्णवांचे।॥४॥धन्य तापीतीर दिसे मनोहर । दोही थडी भार पताकांचे।।५ ।। नामा मुन म्हणे हरि आवडीचे स्थळ । कण्हेर कमळ उदय झाला ॥६ ॥ 


            ४११. निवृत्तीने एकांत केला मुक्ताईशी । गमन  कोणे दिवशी आरंभिले ॥१ ॥ मुक्ताबाई म्हणे जावे । यावे कोठे ।अवघे निघोट स्वरूप स्वामी ॥२ ॥ गर्जतां गगन कडाडली वीज । स्वरुपी सहज मिळयेली || ३ || मावळला दीप ज्योत कोठे होती । सहज सामावती निरंजनी ॥४ ॥ नामा म्हणे हरि जाईल पाहतां । ऐसे माझे चित्ता कळो आले ॥५ ॥


             ४१२.आमुच्या स्वस्थानी नाही पा अंधार । अवघी चराचर प्रकाशत्वे ॥१ ॥ उदय आणि अस्तु नाही स्वरुपासी । ऐसे मुनी ऋषी जाणताती।।२ ।। आम्ही कधी आलो स्वरुप सोडोन । जावे पालटोन जेथिल तेथे।।३ ।। अंतर बाहेर स्वामीचे स्वरुप । स्वये नंदादीप उजळिला ॥४ || वद्य वैशाखमासी दशमीचे दिवशी । गेले ते स्नानासी तपीतीरी।।५ ।। नामा म्हणे गोविंदा मनोहर नभा । अंकुरला गाभा विराटाचा ॥६ ॥ 


            ४१३.निवृत्तीराज म्हणे प्रळयीचा वारा । सुटला शारंगधरा ऐसे वाटे ॥१ ॥ हालते गगन डोलती विमाने । गेले देहभान अवघियांचे ॥२ ॥ अवधियांचे डोळे झांकले एकदा । माध्यान्ही आंबुदा वळुनि आले ॥३ ॥ निवृत्ती पांडुरंग राही रखुमाई । धरा म्हणती घाई मुक्ताईला ॥४ ॥ नामा म्हणे केशवा जाहला उबाळा । से काही केल्या डोळा उघडो नेदी ॥५ ॥


             ४१४. ऋषी म्हणती हरी पातलेसे विघ्न । आतां कैसे प्राण वाचतील ॥१ ॥ कोणाचिया शुद्धि नाहीचिया कोणा । म्हणती नारायणा मृत्यू आला ॥२ ॥ कडाडली विज । निरंजनी जेव्हा । मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली ॥३ ॥ - वैकुंठी लक्ष घंटा वाजती एकघाई । झाली मुक्ताबाई स्वरुपाकार ॥४ ॥ एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी । जेव्हा निरंजनी गुप्त झाली ॥५ ॥ गेले निवारुनी आकाश आभुट । नामा म्हणे कोठे मुक्ताबाई ॥६ ॥ 


            ४१५. उघडिल्या दिशा उघडिले गगन । पाहिले वदन भास्कराचे॥१॥निवृत्तिराजाते कळवळा वाटे भारी।आतां आम्हा हरी आज्ञा द्यावी ॥२ ॥ जयजयकारे टाळ्या पिटीती सकळ । नाचती गोपाळ तापीतीरी ॥३ ॥ नाही॥४॥नानापरि खेद करीती योगेश्वर । लाविती पदर डोळियांसी।पा । नामा म्हणे देवा कैसे आतां काही । आम्हा मुक्ताबाई बोलली नाही।।६ ।।


 *** श्री संत निवृत्तिनाथ म . समाधी सोहळा ***

( Shree Sant Nivrutti Maharaj samadhi sohala )

            ४१६. वंदिली अंबिका निघाले बाहेर । कीर्तन गजर पुढे होत ॥१ ॥ गोदातीरी क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर । उतरले भार वैष्णवांचे ॥२ ॥ म्हणति पांडुरंग दावियेले स्थळ । निवृत्तिराज विकळ फार झाले ॥३ ॥ पंचमीचे दिवशी गेले पंचवटी । उतरले तटी गौतमीचे ॥४ ॥ नामा म्हणे शेवट केला वनमाळी । राहाती ये स्थळी निवृत्तिराज ॥५ ॥ 


            ४१७. तुळसी बेल पुष्पे समर्पिली वर । पाहाती ऋषीश्वर पाहिली पूजा ॥१ ॥ नारा विठा गोंदा पाठविला महादा । झाडावया शेजा पुढे झाले॥शासभोवती जागा झाडिली निर्मळाअनादि हे स्थळ निवृत्तिराजा ॥३ ॥ सभोवती दीप लाविले समाधी । म्हणती पूजा आधी केली असे ॥४॥ अनादि हे पूजा केली म्हणती संत । आतां कोणी आत उतरूं नये ॥५ ॥ नामा म्हणे हरि काय स्थळ चांगले । दुर्वा दर्भ फुले वाहियेली ॥६ ॥ 


            ४१८. समाधीच्या पाळी बैसली सकळी । केला त्या गोपाळी जयजयकार॥१॥निवृत्तीच्या संगे पुंडलीकं पांडुरंग । सिद्ध झाले सांग समाधीसी ॥२ ॥ निवृत्तीदेवी वंदिलीसकळांची पाउले।तीर्थ ते घेतले विठोबाचे ॥३ ॥  पताकांची छाया समाधीसी आली । उतरले खाली निवृत्तीदेव ॥४ ॥ पुंडलिक पांडुरंग गेले बरोबरी । बैसले आसनावरी निवृत्तीराज ||  ५ || नामा म्हणे देवा काय पाहावे आतां । गेला पंढरीनाथ चिद्भानु तो ॥६ ।।


             ४१९ . निवृत्तीराज बैसले समाधी सुचित्त । चिन्मय ते ज्योत उजळती ॥१ ॥ पुंडलिके मिठी निवृत्तीच्या गळां । अवघियांच्या डोळा आसुवे येती ॥२ ॥ विठोबाचे हृदय आलेसे भरून । झांकियेले नयन निवृत्तीराजे ॥३ ॥ पुंडलिके आणिले विठोबासी बाहेर । केला नमस्कार वैष्णवांनी ॥४ ॥ राही रखुमाई बैसल्या गहिवरत । आणिक संत महंत वोसंडती ॥५ ॥ नामा म्हणे हरि शुद्धि नाही सकळां । घाला आता शिळा समाधीसी ॥६ ॥ .


             ४२०. नारा महादा गोंदा विठा झाला विकळ । झांकियेली शीळ समाधीची ॥१ ॥ गंधर्व आणि देव चिंतावले भारी । दीर्घ ध्वनि करी नारा विठा ॥२ ॥ नागोंदा आणि महादा सांडिती शरीर । विसोबा खेचर फार कष्टी ॥३ ॥ लोपलासे भानु पडला , अंधार । नी गेला योगेश्वर निवृत्तिराज ॥४ ॥ गेल्या त्या विभूती अनादि अवतार । आतां देवा फार आठवते ॥५ ॥ नामा म्हणे हरि धरवेना धीर । येती गहिवर वोसंडोनी ॥६ ॥ 


            ४२१. गेले दिगंबर ईश्वर विभूती । राहिल्या त्या कीर्ति जगामाजी ॥१ ॥ वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी । आता ऐसे कोणी होणे नाही।।२ ॥  सांगतील ज्ञान म्हणतील खूण । नयेची साधन निवृत्तीचे ॥३ ॥ परब्रह्म डोळा दावू ऐसे म्हणती । कोणा नये युक्ति ज्ञानोबाची ॥४ ॥ करतील अर्थ सांगतील परमार्थ । नये पां एकांत सोपानाचा।।५ ॥ नामा म्हणे देवा सांगूनियां काही । न ये मुक्ताबाई गुह्य तुझे ॥६ ॥


             ४२२.नानापरि खेद आठविती मना।आता नारायणा सिद्धि न्यावे ॥१ ॥ समाधीसी केली आरती पंचारती । राहिली निवृत्ती स्वरुपी तुझ्या ॥२ ॥ सुखाचे साधन झाली चौघेजणे । केली नारायणे बोळवण ॥३ ॥ पंचक्रोशावरी उभे ठेले भार । केला नमस्कार समाधीसी ॥४ ॥ नामा म्हणे आता जावे पंढरपुरा । समाधीचा सारा विधी झाला ॥५॥


 ( श्री संत तुकाराम महाराज वैकुंठ गमनाचे अभंग ) 


.*.*. निर्याणाचे अभंग .*.*. 

( Niryanache Abhang )

            ४२३ . शोधितांचि नये । म्हणोनि वोळगतोंख पाय ॥१ ॥ आतां दिसो नये जना । ऐसें करा नारायणा ॥२ ॥ परतोनी मन । गेलें ठायींचि मुरोन ॥३ ॥ विसरला तुका । बोलों चालों झाला मुका ॥४ ॥


             ४२४. रज्जुसर्पाकार । भासयलें जगडंबर ॥१ ॥ म्हणोनी आवडती पाय । घेतों आलाय बलाय॥२॥ दृश्य द्रुमाकार लाणी । केलो सर्वस्वासी धनी ॥३ ॥ तुकीं तुकला तुका । विश्वी भरोनी उरला लोकां ॥४ ॥ 


            ४२५.म्हणवितों दास । परि मी असें उदास ॥१ ॥ हाचि निश्चय माझा । परी मी निशयाहूनि दुजा।।२ ।। सरतें कर्तृत्व माझ्याने।परि मी त्याहून असें भिन्न।।३ ।। तुका तुकासी तुकला । तुका तुकाहूनि निराळा || ४ ||


             ४२६. घोंटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती । मुक्तां आत्मस्थिती सांडवीन ॥१ ॥ वाट काया होतसे कीर्तनीं । भग्य तरी ऋणी देव ऐसा ॥२ ॥ तीर्थभ्रामकासी आणीन आळस । कडू स्वर्गवास करीन भोग ॥३ ॥ सांडवीन तपोनिधा अभिमान । यज्ञ आणि दान लाजवीन ॥४ ॥ भक्तिभाग्यसीमा साधीन पुरुषार्थ । ब्रह्मींचा जो अर्थ निजठेवा ॥५ ॥ धन्य म्हणवीन येह लोकी लोकां । भाग्य आम्ही तुका देखियेला।।६ ।। 


            ४२७. संसाराचे अंगी अवघींच व्यसनें।आम्हीया कीर्तनें शुद्ध झालों॥१॥आतां हें सोवळे झाले त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेलें॥२॥ब्रह्मपुरी वास करणे अखंड । न देखिजे तोंड विटाळाचें।।३ ।। तुका म्हणे आम्हां एकांताचा वासाब्रह्मीं ब्रह्मरस सेवू सदा ॥४ ॥


             ४२८. गरुडाचे पायीं । ठेवीं वेळोवेळां डोई।।१ ।। वेगीं आनावा तो हरी । मज दीनातें उद्धरीं ॥२ ॥ पाय लक्ष्मीच्या हातीं । म्हणोन येतो काकुलती।।३ ।। तुका म्हणे शेषा । जागे करा हृषीकेशा ॥४ ॥ 


            ४२९ . तुम्ही सनकादिक संत । म्हणविता कृपावंत।। एवढा करा उपकार । सांगा देवा नमस्कार ॥२॥माझी भाकावी करुणा | विनवा पंढरीचा राणा ॥३॥ तुका म्हणे मज आठवा । मूळ लवकरी पाठवा।।४ ।। 


            ४३०. आपल्या माहेरा जाईन मी आतां । निरोप या संतां हाती आला ॥१ ॥ सुख दुःख माझें आईकिलें कानीं । कळवळा मनीं करुणेचा ॥२ ॥ करूनि सिद्ध मूळ साऊलें भातुके । येती दिसे एके न्यावयासी ॥३ ॥ त्याचि पंथें माझें लागलेंसें चित्त । वाट पाहे नित्य माहेराची।।४ ॥ तुका म्हणे आतां येतील न्यावया । अंगें आपुलिया मायबाप ॥५ ॥ 


            ४३१. चिन्हें उमटती अंगीं । शकुनाजोगी उत्तम ॥१ ॥ आठवला बापमाय । येईल काय मूळ नेणों ॥२ ॥ उत्कंठित झाले मन । हीच खूण तेथींचि ॥३ ॥ तुका म्हणे कामा वारी । आळस घरी करमेना ॥४ ॥ 


            ४३२. आरोनियां पाहें वाट । कटकट सोसेना ॥१ ॥ आलियांस पुसें मात । तेथें चित्त लागलें ॥२ ॥ दळी कांडी लोकां ऐसें । परि मी नसें ते ठायीं ॥३ ॥ तुका म्हणे येथें पिसे । तेथें तैसें असेल ॥४ ॥ 


            ४३३. ये थीलिया अनुभवें । कळों जीवें येतसे ॥१ ॥ दोहीं ठायीं एक जीवामाझी कीव त्या अंगीं॥२॥भुकें भूकची खाऊनि धाय । नाहीं हाय अन्नाची॥३॥तुका म्हणे सुख झालें । अंतर धालें त्यागुणे ॥४ ॥


            ४३४. पैल आले हरि । शंख चक्र शोभे करी ॥१ ॥ गरुड येतो फडत्कारें । ना भी ना भी म्हणे त्वरें।।२ ।। मुगुट कुडलांच्या दीप्ति ।तेजें लोपला गभस्ति ॥३ ॥ मेघःश्यामवर्ण हरािमूर्ति डोळस साजिरी।।४ ॥ चतुर्भुज वैजयंती।गळां माळ हे रुळती ॥५ ॥ पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥६ ॥ तुका झालासे संतुष्ट । घरा आले वैकुंठपीठ ॥७ ॥


             ४३५. शंखचक्रगदापद्मा पैल आला . पुरुषोत्तम ॥शाना भी ना भी भक्तराया।वेगी पावलों असखया।।२।।दुरुनि येतां दिसे दृष्टी।धाकें दोष पळती ।। सृष्टी॥शातुका देखोनि एकला।वैकुंठींहूनि हरि आला ॥४ ॥ ४३६.पैल दिसतील भार । दिंड्या पताका अपार ॥१ ॥ आला पंढरीचा राणा । दिसतील त्याच्या । खुणा । सुख वाटे मना । डोळे बाह्य स्फुरती ॥२ ॥ उठिले गजर नामाचे । दळभार वैष्णवांचे ॥३ ॥ तुका करी रिता ठाव । त्यासी बैसावया वाव ॥४ ॥


             ४३७ . चला जाऊं रे सामोरे । पुढे भेटों विठ्ठल चला धुरे ॥१ ॥ तुका आनंदला मनीं । कैसा जातो लोटांगणीं । फेडावया धणी । प्रेम सुखाची आजी ॥२ ॥ पुढे आले कृपावंत । मायबाप साधुसंत ॥३ ॥ तुका आळंगिला बाहीं । ठेविला विठोबाचे पायीं ॥४ ॥


             ४३८.पाहुणे घरासी।आजी आले हृषीकेशी ॥१ ॥ काय करूं उपचार । कोंप मोडकी जर्जर ॥२ ॥ दरदरीत पाण्या । माजी रांधियेल्या कण्या।॥३ ॥ घरी मोडकीया बाजा । वरी वाकळांच्या शेजा।।४ ॥ मखुशुद्धि तुळसीदळ । तुका म्हाणे मी दुर्बळ।।५ ।। 


            ४३९ . संती केला अंगीकार । त्यासी अभिमान थोर ॥१ ॥ कांहीं ठेविलें चरणीं । घेती तेंचि पुरवूनि । तुका पायवणी । घेऊनियां निराळा ॥२ ॥ नसतां काहीं संचित । भेटी झाली अवचित ॥३ ॥ देव मिळोनिया भक्त । तुका केलासे सनाथ ॥४ ॥ 


            ४४०. अवघियांच्या आलों मूळ । एक वेळ न्यावया ॥१ ॥ सिद्ध व्हावें सिद्ध व्हावें । आधीं ठावें करितों ॥२ ॥ जोवरी ते घटिका दुरी । आहे उरी तो काळ ॥३ ॥ मंगळाचे वेळे उभे । असा शोभे सावध ॥४ ॥ अवघियांचा योग घडे । तरी जोडे श्लाघ्यता ॥५ ॥ तुका म्हणे पाहें वाट । बहु आट करूनि ॥६ ॥ 


            ४४१. सकळही माझी बोळवण करा । परतोनी घरा जावें तुम्ही ॥१ ॥ कर्मधर्मे तुम्हां असावें कल्याण । घ्या माझें वचन आशीर्वाद ॥२॥वाढवूनि दिलें एकाचिये हातीं । सकळ निश्चिती झाली तेथें ॥३ ॥ आतां मज जाणे प्राणेश्वरासवें । मी माझिया भावें अनुसरलों॥४॥वाढवितां लोभ होईल उशीर । अवघींच स्थिर करा ठायीं ॥५ ॥ धर्म अर्थ काम झाला एके ठायीं । मेळविला जिहीं हाताहात ॥६ ॥ तुका म्हणे तुम्हां आम्हां हेचि भेटी । उरल्या त्या गोष्टी बोलावया।॥७ ॥ 


            ४४२. बोलिलों तें आतां पाळावें वचन । ऐसें पुण्य कोण माझे गांठीं ॥१ ॥ जातों आतां आज्ञा घेऊनियां स्वामी । काळक्षेप आम्ही करूं कोठे ॥२ ॥ न घडे यावरी न धरवे धीर । पीडतां हें राष्ट्र देखोनी जग ॥३ ॥ हातीं धरोनियां देवें नेला तुका । जेथें नाहीं लोकां पराश्रम ॥४ ॥ 


            ४४३. करावें तें काम । उगाच वाढवावा श्रम ॥२ ॥ अवघे एकमय । राज्य बोलों चालों नये ॥२ ॥ दुजीयाची सत्ता । नचलेसी झाली आतां ॥३ ॥ आतां नाहीं तुका । पुन्हा हारपला या लोकां ॥४ ॥ 


            ४४४. आम्ही जातो तुम्ही कृपा असों द्यावी ॥ सकळां सांगावी विनंती माझी ॥१॥ वाड वेळ झाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥२ ॥ अंतकाळी विठो आम्हांसी पावला । कुडी सहित झाला गुप्त तुका ॥२ ॥ 


            ४४५. न देखिजे ऐसें केले।या विठ्ठलें दुःखासी ॥१॥ कृपेचिये सिंहासनीं।अधिष्ठानी बसविलें॥२॥वाजता तो नलगे वारा।क्षीरसागरा शयनी॥शातुका म्हणे अवघे ठायीं । मज पायीं राखिलें ॥४ ॥


MajhiMauli-blogger





FAIR-USE COPYRIGHT DISCLAIMER


Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.