गुरूचरित्र/अध्याय एकोणपन्नासावा | Gurucharitra / Aadhyay-49 (forty-nine) maulimajhi-blogger

shreyash feed ads 2

 श्रीगणेशाय नमः ।

गुरूचरित्र/अध्याय एकोणपन्नासावा | Gurucharitra / Aadhyay-49 (forty-nine) maulimajhi-blogger





|| अध्याय एकोणपन्नासावा ||

नामधारक शिष्य सगुण । सिद्धमुनीतें नमन करुन । विनवीतसे कर जोडून । भक्तिभावेंकरोनिया ॥१॥


त्रैमूर्तीचा अवतार । झाला वेषधारी नर । राहिला प्रीतीं गाणगापुर । कवण क्षेत्र म्हणोनिया ॥२॥


भूमीवरी प्रख्यात । तीर्थें असती असंख्यात । समस्त सांडोनिया येथ काय कारण वांस केला ॥३॥


या स्थानाचें महिमान । सांगा स्वामी विस्तारोन । म्हणोनि धरी सिद्धाचे चरण । नामधारक तये वेळीं ॥४॥


ऐकोन तयाचें वचन । सिद्धमुनि संतोषोन । सांगतसे विस्तारोन । ऐका श्रोते एकचित्तें ॥५॥


आश्विन वद्य चतुर्दशीसी । दिपवाळी पर्वणीसी । श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । स्नान करावें त्रिस्थळीचें ॥६॥


गया-प्रयाग-वाराणशीसी । चला यात्रे पुत्रकलत्रेंसी । विप्र म्हणती श्रीगुरुसी । आइती करणें म्हणोनिया ॥७॥


ऐकोन श्रीगुरु हांसती । ग्रामजवळी तीर्थें असती । करणें न लागे तुम्हां आइती । चला नेईन तुम्हांसी ॥८॥


ऐसें म्हणोनि भक्तांसी । गेले अमरजासंगमासी । स्नान केलें महाहर्षीं । शिष्यांसहित श्रीगुरुंनीं ॥९॥


गुरु म्हणती शिष्यांसी । महिमा अपार संगमासी । प्रयागसमान परियेसीं । षट्‌कुळामध्यें स्नान करणें ॥१०॥


विशेष नदी भीमातीर । अमरजासंगम थोर । गंगा यमुना वाहे निर्धार । तीर्थ बरवें परियेसा ॥११॥


विशेषें आपण उत्तरे वाहे । याचें पुण्य अपार आहे । शताधिक पुण्य पाहे । काशीहून परियेसा ॥१२॥


आणिक अष्‍ट तीर्थें असती । तयांचा महिमा विख्यात जगतीं । सांगेन ऐका एकचित्तीं । श्रीगुरु म्हणती शिष्यांसी ॥१३॥


ऐकोन श्रीगुरुचें वचन । विनविताती भक्तजंन । अमरजानदी नाम कोण । कोणापासाव उत्पत्ति ॥१४॥


श्रीगुरु म्हणती भक्तांसी । बरवें पुसिलें आम्हांसी । जालंधर पुराणासी । असे कथा प्रख्यात ॥१५॥


जालंधर नामें निशाचर । समस्त जिंकिलें सुरवर । आपुलें केलें इंद्रपुर । समस्त देव पळाले ॥१६॥


देवा दैत्यां झालें युद्ध । सुरवर मारिले बहुविध । इंद्रें जाऊनि प्रबोध । ईश्वराप्रती सांगितला ॥१७॥


इंद्र म्हणे ऐक शिवा । दैत्यें मारिलें असे देवां । शीघ्र प्रतिकार करावा । म्हणोनि चरणीं लागला ॥१८॥


आम्ही मारितों दैत्यांसी । रक्त पडतसे भूमीसी । अखिल दैत्यबिंदूंसी । अधिक उपजवी भूमीवरी ॥१९॥


स्वर्ग मृत्यु पाताळ । सर्वत्र मारिलें दैत्यकुळ । मारिले आमुचे देव सकळ । म्हणोनि आलों तुम्हांपासीं ॥२०॥


ऐसें वचन ऐकोनि । ईश्वर प्रज्वाळला मनीं । निघाला रुद्र होऊनि । दैत्यनिर्दाळण करावया ॥२१॥


इंद्र विनवी ईश्वरासी । वधावया दैत्यांसी । जीवन आणावया देवांसी । ऐसा प्रतिकार करावा ॥२२॥


संतोषोनि गिरिजारमण । अमृतमंत्र उच्चारोन । घट दिधला तत्क्ष्ण । संजीवनी उदक देखा ॥२३॥


तें उदक घेवोनि इंद्रराव । शिंपताचि समस्त देव । उठोनिया अमर सर्व । स्वर्गास जाती तये वेळीं ॥२४॥


उरलें अमृत घटीं होतें । घेऊनि जातां अमरनाथें । पडिलें भूमीं अवचितें । प्रवाह आला क्षितीवरी ॥२५॥


ते संजीवनी नामें नदी । उद्‌भवली भूमीं प्रसिद्धी । अमरजा नाम याचि विधीं । प्रख्यात झाली अवधारा ॥२६॥


या कारणें या नदीसी । जे स्नान करिती भक्तींसी । काळमृत्यु न बाधे त्यासी । अपमृत्यु घडे केवी ॥२७॥


शतायुषी पुरुष होती । रोगराई न पीडिती । अपस्मारादि रोग जाती । ब्रह्महत्यादि पातकें ॥२८॥


अमृतनदी नाम तियेसी । संगम झाला भीमरथीसी । तीर्थ झालें प्रयागसरसी । त्रिवेणीचा संगम ॥२९॥


कार्तिकादि माघमासीं । स्नान करिती भक्तींसी । इह सौख्य परलोकासी । मोक्षस्थाना पावती ॥३०॥


सोम-सूर्य-ग्रहणासी । संक्रमण सोम-अमावास्येसी । पुण्यतिथि एकादशीसी । स्नान करावें अनंत पुण्य ॥३१॥


साधितां प्रतिदिवस जरी । सदा करावें मनोहरी । समस्त दोष जाती दूरी । शतायुषी श्रियायुक्त होय ॥३२॥


ऐसा संगममहिमा ऐका । पुढें सांगतसें तीर्थ विशेखा । दिसे अश्वत्थ संमुखा । मनोहर तीर्थ असे ॥३३॥


या तीर्थी स्नान केलिया । मनोहर पाविजे काया । कल्पवृक्षस्थानीं अनुपम्या । कल्पिलें फळ पाविजे ॥३४॥


अश्वत्थ नव्हे हा कल्पतरु । जाणावें तुम्हीं निर्धारु । जें जें चिंतिती मनीं नरु । पावती काम्यें अवधारा ॥३५॥


ऐसें मनोहर तीर्थ । ठावें असे प्रख्यात । संमुख असे अश्वत्थ । सदा असो याचिया गुणें ॥३६॥


जे जन येऊनि सेवा करिती । तयांचे मनोरथ पुरती । न धरावा संदेह आतां चित्तीं । ऐसें म्हणती श्रीगुरुनाथ ॥३७॥


आम्ही वसतों सदा येथें । ऐसें जाणा तुम्ही निरुतें । दृष्‍टीं पडतां मुक्ति होते । खूण तुम्हां सांगेन ॥३८॥


कल्पवृक्षातें पूजोनि । मग जावें शंकरभुवनीं । संगमेश्वर असे त्रिनयनी । पूजा करावी मनोभावें ॥३९॥


जैसा पर्वती मल्लिकार्जुन । तैसा संगमीं रुद्र आपण । भक्तिपूर्वक प्रदक्षिण । करावी तुम्ही अवधारा ॥४०॥


नंदिकेश्वरातें नमोनि । नमन करावें चंडस्थानीं । पूर्ण नदीं सव्य करोनि । मग जावें सोमसूत्रासी ॥४१॥


सवेंचि परतोनि वृषभासी । नमोनि जावें चंडापासीं । पुनः जावें सोमसूत्रासी । येणें विधीं प्रदक्षिणा ॥४२॥


ऐसी प्रदक्षिणा देखा । तीन वेळां करोनि ऐका । वृषभस्थानीं येऊनि निका । अवलोकावें शिवासी ॥४३॥


वामहस्तीं वृषण धरोनि । तर्जनी अंगुष्‍ठ शृंगीं ठेवोनि । पूजा पहावी दोनी नयनीं । इंद्रासमान होय नर ॥४४॥


धनधान्यादि संपत्ति । लक्ष्मी राहे अखंडिती । पुत्र पौत्र त्यासी होती । संगमेश्वर पूजिलिया ॥४५॥


पुढें तीर्थ वाराणशी । अर्घ कोश परियेसीं । ग्राम असे नागेशी । तेथोनि उद्‌भव असे जाण ॥४६॥


याचें असे आख्यान । कथा नव्हे प्रत्यक्ष जाण । होता एक ब्राह्मण । भारद्वाज गोत्राचा ॥४७॥


विरक्त असे ईश्वरभक्त । सर्वसंग त्याग करीत । आपण रत अनुष्‍ठानांत । सदा ध्याई शिवासी ॥४८॥


प्रसन्न झाला चंद्रमौळी । सदाशिव दिसे जवळी । विप्रा आल्हाद सर्व काळीं । देहभाव विसरोनि हिंडत ॥४९॥


लोक म्हणती पिसा त्यासी । निंदा करिती बहुवसीं । दोघे बंधु असती तयासी । नामें त्यांचीं अवधारा ॥५०॥


एका नाम असे ईश्वर । दुसरा नामें असे पांडुरंगेश्वर । बंधु एकला करोनि अव्हेर । आपण निघाले काशीसी ॥५१॥


करोनिया सर्व आइती । सर्व निघाले त्वरिती । तया पिशातें पाचारिती । चला जाऊं म्हणोनिया ॥५२॥


ब्रह्मज्ञानी द्विज निका । पिसा म्हणती मूर्ख लोका । बंधूंसि म्हणे द्विज ऐका । नका जाऊं काशीसी ॥५३॥


विश्वेश्वर असे मजजवळी । दावीन तुम्हां तात्काळीं । आश्चर्य करिती सकळी । दावीं म्हणती बंधुजन ॥५४॥


काशीस जावें अति प्रयास । येथें भेटे तरी कां सायास । म्हणोनि बोलताती हर्ष । तये वेळीं अवधारा ॥५५॥


इतुकिया अवसरीं । विप्र गंगास्नान करी । ध्यानस्थ होता साक्षात्कारी । ईश्वर आला तयाजवळी ॥५६॥


विनवीतसे शिवासी । आम्हां नित्य पाहिजे काशी । दर्शन होय विश्वेश्वरासी । म्हणोनि चरणीं लागला ॥५७॥


ईश्वर भोळा चक्रवर्ती । प्रसन्न झाला अतिप्रीतीं । दिसे तीच काशी त्वरितीं । मणिकर्णिका कुंड झालें ॥५८॥


विश्वेश्वराची मूर्ति एक । निघाली कुंडीं विशेख । नदी उत्तरे दिसे निक । एकबाणप्रमाण असे ॥५९॥


उदक निघालें कुंडांतून । जैसें भागीरथी गहन । ज्या ज्या असती काशींत खुणा । समस्त असती तयासी ॥६०॥


संगम झाला नदी भीमा । तीर्थ असे काशी उत्तमा । आचार करिती सप्रेमा । बंधु ज्ञानी म्हणती मग ॥६१॥


म्हणे ब्राह्मण बंधूंसी । काशीस न जावें आमुचे वंशीं । समस्तें आचरावें ही काशी । आम्हां शंकरें सांगितलें ॥६२॥


आपुलें नाम ऐसें जाणा । गोसावी नाम निर्धारीं खुणा । तुम्हीं बंधु दोघेजणां । आराधावें ऐसें निरोपिलें ॥६३॥


दोघीं जावें पंढरपुरा । तेथें असे पुंडलीकवरा । सदा तुम्ही पूजा करा । आराध्या नामें विख्यात ॥६४॥


प्रतिवर्षीं कार्तिकीसी । येथें यावें निर्धारेंसी । तीर्थ असे विशेषीं । ऐसें म्हणे ब्राह्मण ॥६५॥


श्रीगुरु म्हणती भक्तासी । काशीतीर्थ प्रगटलें ऐसी । न धरावा संशय तुम्हीं मानसीं । वाराणसी प्रत्यक्ष ही ॥६६॥


ऐकोनि समस्त द्विजवर । करिती स्नान निर्मळ आचार । तेथोनि पुढें येती गुरुवर । सिद्ध सांगे नामधारका ॥६७॥


श्रीगुरु म्हणती सकळिकांसी । तीर्थ दाविती पापविनाशी । स्नानमात्रें पाप नाशी । जैसा तृणा अग्नि लागे ॥६८॥


आपुले भगिनी रत्‍नाईसी । दोष असे बहुवसीं । बोलावोनि त्या समयासी । पुसताती श्रीगुरुमूर्ति ॥६९॥


ऐक पूर्वदोष भगिनी । तूं आलीस आमुचे दर्शनीं । पाप तुझें असे गहनीं । आठवणें करीं मनांत ॥७०॥


ऐकोनि श्रीगुरुच्या बोला । पायां पडे वेळोवेळां । अज्ञान आपण मूढ केवळा । इतुकें कैसें ज्ञान मज ॥७१॥


तूं जगदात्मा विश्वव्यापक । तूंचि ज्ञानज्योतिप्रकाशक । सर्व जाणसी तूंचि एक । विस्तारोनि सांग मज ॥७२॥


श्रीगुरु म्हणती तियेसी । आपुलें पाप मज पुससी । वधिलें पांच मार्जारांसी । नेणसी खूण धरीं आपुलीं ॥७३॥


होती मार्जारी गर्भिणी । प्रसूति झाली भांडयामधुनी । न पाहतां उदक घालुनी । झाकोनि ठेविली अग्नीवरी ॥७४॥


पांच मार्जारांचा घात । लागला दोष बहुत । ऐसें ऐकोनिया त्वरित । श्वेतकुष्‍ठ झाले तिसी ॥७५॥


देखोनिया भयाभीत झाली । श्रीगुरुचरणा येऊनि लागली । विनवीतसे करुणा बहाळी । कृपा करी गा गुरुमूर्ति ॥७६॥


करोनि समस्तपापराशि । तीर्थीं जाती वाराणशी । मी आलें तुझे दर्शनासी । पापावेगळी होईन म्हणोनि ॥७७॥


श्रीगुरु पुसती तियेसी । तुज राहे पापराशि । पुढले जन्मीं जरी भोगिसी । तरी कुष्‍ठ जाईल आतां ॥७८॥


रत्‍नाई विनवी स्वामियासी । उबगलें बहुत जन्मासी । याचि कारणें तुझे दर्शनासी । पापावेगळें होऊं म्हणतसें ॥७९॥


आतां पुरे जन्म आपणा । म्हणोनि धरिले तुझे चरणा । याचि जन्मीं भोगीन जाणा । पापाचें फळ म्हणतसे ॥८०॥


इतुकें ऐकोनि गुरुमूर्ति । रत्‍नाईस निरोप देती । पापविनाश तीर्था जाय त्वरिती । स्नानमात्रें जाईल कुष्‍ठ ॥८१॥


नित्य करीं हो येथें स्नान । सप्तजन्मींचे दोष दहन संदेह न करितां होय अनुमान । म्हणोनि सांगती श्रीगुरु ॥८२॥


सिद्ध म्हणे नामधारकासी । आम्हीं देखिलें दृष्‍टींसी । स्नान करितां त्रिरात्रीसी । कुष्‍ठ तिचें परिहारिलें ॥८३॥


ऐसें प्रख्यात तीर्थ देखा । नाम पापविनाशी ऐका । जे करिती स्नान भक्तिपूर्वका । सप्तजन्मींचीं पापें जाती ॥८४॥


तीर्थमहिमा देखोन । रत्‍नाबाई संतोषोन । राहिली मठ बांधोन । तीर्थासन्निध अवधारा ॥८५॥


पुढें कोटितीर्थ देखा । श्रीगुरु दाविती सकळिकां । स्नानमात्रें होय निका । याचें आख्यान बहु असे ॥८६॥


जंबुद्वीपीं जितकीं तीर्थें । एकेक महिमा अपरिमितें । इतुकिया वास कोटितीर्थें । विस्तार असे सांगतां ॥८७॥


सोम-सूर्य-ग्रहणासी । अथवा संक्रांतिपर्वणीसी । अमापौर्णिमा प्रतिपदेसी । स्नान तेथें करावें ॥८८॥


सवत्सेसी धेनु देखा । सालंकृत करोनि ऐका । दान द्यावें द्विजा निका । एकेक दान कोटिसरसे ॥८९॥


तीर्थमहिमा आहे कैसी । स्नान केलिया अनंत फळ पावसी । एकेक दान कोटीसरसी । दोन तीर्थीं करावें ॥९०॥


पुढें तीर्थ रुद्रपद । कथा असे अतिविनोद । गयातीर्थ समप्रद । तेथें असे अवधारा । जे जे आचार गयेसी । करावे तेथें परियेसीं । पूजा करा रुद्रपदाची । कोटि जन्मींचीं पापें जाती ॥९२॥


पुढें असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र । केशव देव सन्निध तत्र । पुण्यराशिस्थान असे ॥९३॥


या तीर्थी स्नान करिता । ज्ञान होय पतितां । अस्थि होती चक्रांकिता । द्वारावतीसमान देखा ॥९४॥


या तीर्थीं स्नान करोनि । पूजा करावी केशवचरणीं । द्वारावती चतुर्गुणी । पुण्य असे अवधारा ॥९५॥


ऐकोनि श्रीगुरुचें वचन । समस्त करिती स्नान दान । पुढें असे मन्मथदहन । तीर्थ सांगती श्रीगुरु ॥९६॥


ग्रामपूर्वभागेसी । कल्लेश्वर देव परियेसीं । जैसें गोकर्णमहाबळेश्वरासी । समान क्षेत्र परियेसा ॥९७॥


मन्मथ तीर्थीं स्नान करावें । कल्लेश्वरातें पूजावें । प्रजावृद्धि होय बरवें । अष्‍टैश्चर्यें पाविजे ॥९८॥


आषाढ श्रावण मासीं । अभिषेक करावा देवासी । दीपाराधना कार्तिकमासीं । अनंत पुण्य अवधारा ॥९९॥


ऐसा अष्‍टतीर्थमहिमा । सांगती श्रीगुरु पुरुषोत्तमा । संतोषोनि भक्त उत्तमा । अति उल्हास करिताती ॥१००॥


म्हणती समस्त भक्तजन । नेणों तीर्थाचें महिमान । स्वामीं निरोपिलें कृपेनें । पुनीत केलें आम्हांसी ॥१॥


जवळी असतां समस्त तीर्थें । कां जावें दूर यात्रे । स्थान असे हें पवित्र । म्हणोनि समस्त आचरती ॥२॥


अष्‍टतीर्थें सांगत । श्रीगुरु गेले मठांत । समाराधना करिती भक्त । महानंद प्रवर्तला ॥३॥


सिद्ध म्हणे नामधारकासी । तीर्थमहिमा आहे ऐसी । श्रीगुरु सांगती आम्हांसी । म्हणोनि तुज निरोपिलें ॥४॥


म्हणे सरस्वतीगंगाधर । क्षेत्र थोर गाणगापुर । तीर्थें असती अपरंपार । आचरा तुम्ही भक्तीनें ॥५॥


इति श्रीगुरुचरित्रामृत । सिद्धमुनि-शिष्यसंवाद बहुत । गाणगापुरमाहात्म्य विख्यात । एकुणपन्नासाव्यांत कथियेलें ॥१०६॥


इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अमरजासंगमगाणगापुरक्षेत्रमहिमावर्णनं नाम एकोनपंचाशत्तमोऽध्यायः ॥४९॥


श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ॥


(ओवीसंख्या १०६)




Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.