गुरूचरित्र/अध्याय सत्तेचाळीसावा | gurucharitra adhyay 47 (forty seven) maulimajhi-blogger

shreyash feed ads 2

  श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

गुरूचरित्र/अध्याय सत्तेचाळीसावा | gurucharitra adhyay 47 (forty seven) maulimajhi-blogger


 


|| अध्याय सत्तेचाळीसावा ||

सिद्ध म्हणे नामधारकासी । अपूर्व एक कथा वर्तली परियेसीं । श्रीगुरुचरित्र अतिकवतुकेंसीं । परम पवित्र ऐक पां ॥१॥


गाणगापुरीं असतां श्रीगुरु । ख्याति जाहली अपारु । भक्त होता एक शूद्रु । नाम तया 'पर्वतेश्वर' ॥२॥


त्याच्या भक्तीचा प्रकारु । सांगेन ऐका मन स्थिरु । भक्ति केली श्रीगुरु । कायावाचामनेंकरुनि ॥३॥


श्रीगुरु नित्य संगमासी । जात असती अनुष्‍ठानासी । मार्गीं तो शूद्र परियेसीं । आपुले शेतीं उभा असे ॥४॥


श्रीगुरुतें नित्य देखोनि । येई धांवत शेतांतूनि । साष्‍टांगीं नमन करुनि । पुनरपि जाय आपुले स्थाना ॥५॥


माध्यान्हकाळीं मठासी । येतां मागुती नमस्कारी परियेसीं । ऐसें किती दिवसवर्षीं । शूद्र भक्ति करीतसे ॥६॥


श्रीगुरु तयासी न बोलती । नमन केलिया उगीच असती । येणेंविधि बहु काळ क्रमिती । आला शूद्र नमस्कारा ॥७॥


नमन करितां शूद्रासी । पुसती श्रीगुरु संतोषीं । कां रे नित्य कष्‍टतोसी । आड पडतोसी येऊनियां ॥८॥


तुझे मनीं काय वासना । सांगे त्वरित विस्तारुन । शूद्र विनवी कर जोडून । शेत आपुलें पिकावें ॥९॥


श्रीगुरु पुसती तयासी । काय पेरिलें तुझ्या शेतासी । शूद्र म्हणे यावनाळ बहुवसी । पीक जाहलें तुझे धर्में ॥१०॥


तुम्हांसी नित्य नमन करितां । पीक दिसे अधिकता । पोटरें येतील आतां । आतां तुझेनि धर्में जेवूं ॥११॥


स्वामी यावें शेतापाशीं । पहावें अमृतदृष्‍टींसीं । तूं समस्तां प्रतिपाळिसी । शूद्र म्हणोनि नुपेक्षावें ॥१२॥


श्रीगुरु गेले शेतापाशीं । पाहूनि म्हणती त्या शूद्रासी । सांगेन तुज जरी ऐकसी । विश्वास होईल बोलाचा ॥१३॥


जें सांगेन तुज एक वाक्येंसीं । जरी भक्तीनें अंगीकारिसी । तरीच सांगूं परियेसीं । एकोभावें त्वां करावें ॥१४॥


शूद्र विनवी स्वामियासी । गुरुवाक्य कारण आम्हांसी । दुसरा भाव मजपाशीं । नाहीं स्वामी म्हणतसे ॥१५॥


मग निरोपिती श्रीगुरु त्यासी । आम्ही जातों संगमासी । परतोनि येऊं माध्यान्हेसी । तंव सर्व पीक कापावें ॥१६॥


ऐसें सांगोनि शूद्रासी । श्रीगुरु गेले संगमासी । शूद्र विचार करी मानसीं । गुरुवाक्य मज कारण ॥१७॥


शीघ्र आला ग्रामांत । अधिकारियासी विनवीत । खंडोनि द्यावें आपलें शेत । गत संवत्सराप्रमाणें देईन धान्य ॥१८॥


अधिकारी म्हणती त्यासी । पीक जाहलें बहु शेतासी । म्हणोनि गुतका मागतोसी । अंगीकार न करूं जाण ॥१९॥


नानाप्रकारें विनवी त्यासी । द्विगुण देईन गतसंवत्सरासी ; । अंगीकारिलें संतोषीं । वचनपत्र लिहूनि घेती ॥२०॥


आपण अभयपत्र घेऊनि । लोक मिळवोनि तत्क्षणीं । गेला शेता संतोषोनि । कापीन म्हणे वेगेंसीं ॥२१॥


कापूं आरंभिलें पिकासी । स्त्री-पुत्र वर्जिती त्यासी । पाषाण घेऊनि स्त्री-पुत्रांसी । मारुं आला तो शूद्र ॥२२॥


समस्तांतें मारी येणेंपरी । पळत आलीं गांवाभीतरी । आड पडती राजद्वारीं । "पिसें लागलें पतीसी ॥२३॥


पीक होतें बहुवसीं । कापूनि टाकितो मूर्खपणेंसीं । वर्जितां पहा आम्ही त्यासी । पाषाण घेउनि मारी तो ॥२४॥


संन्यासी यतीश्वराच्या बोलें । पीक सर्वही कापिलें । आमुचें जेवितें भाण गेलें । आणिक मासां भक्षितों आम्ही"॥२५॥


अधिकारी म्हणती तयांसी । कापीना कां आपुल्या शेतासी । पत्र असे आम्हांपाशीं । गतवत्सरेसीं द्विगुण द्यावें ॥२६॥


वर्जावया माणसें पाठविती । नायके शूद्र कवणें गतीं । शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती । पेंवीं धान्य असें तें देईन ॥२७॥


जावोनि सांगती अधिकारियासी । आम्हीं सांगितलें त्या शूद्रासी । त्यानें सांगितलें तुम्हांसी । विनोद असे परियेसा ॥२८॥


जरी भीतील अधिकारी । तरी धान्य देईन आतांचि घरीं । गुरें बांधीन त्यांचे द्वारीं । पत्र आपण दिलें असे ॥२९॥


अधिकारी म्हणती तयासी । आम्हां चिंता असे कायसी । पेंवें ठाउकीं असतीं आम्हांसी । धान्य असे अपार ॥३०॥


इतुकें होतां शूद्र देखा । पीक कापिलें मनःपूर्वका । उभा असे मार्गीं ऐका । श्रीगुरु आले परतोनि ॥३१॥


नमन करुनि श्रीगुरुसी । शेत कापिलें दाविलें त्यांसी । श्रीगुरुनाथ म्हणती तयासी । वायां कापिलें म्हणोनि ॥३२॥


विनोदें तुज सांगितलें । तुवां निर्धारें कापिलें ।; म्हणे तुमचें वाक्य भलें । तेंचि कामधेनु मज ॥३३॥


ऐसें ऐकोनि श्रीगुरु म्हणती । निर्धार असेल तुझे चित्तीं । होईल अत्यंत फळश्रुती । चिंता न करीं म्हणोनियां ॥३४॥


ऐसें सांगोनि श्रीगुरुनाथ । आले आपण ग्रामांत । सवें शूद्र असे येत । आपुले घराप्रती गेला ॥३५॥


पुसावया लोक येती समस्त । होतसे त्याचे घरीं आकांत । स्त्री-पुत्र सर्व रुदन करीत । म्हणती आमुचा ग्रास गेला ॥३६॥


शूद्र समस्तां संबोखी । न करीं चिंता रहा सुखी । गुरुसोय नेणिजे मूर्खीं । कामधेनु असे वाक्य त्यांचें ॥३७॥


एकेकाचे सहस्त्रगुण । अधिक लाभाल तुम्ही जन । स्थिर करा अंतःकरण । हानि नव्हे मी जाणें ॥३८॥


नर म्हणतां तुम्ही त्यासी । शिवमुनि असे भरंवसीं । असेल कारण पुढें आम्हांसी । म्हणोनि निरोपिलें ऐसें मज ॥३९॥


श्रीगुरुकृपा होय ज्यासी । दैन्य कैंचें असे त्यासी । निधान जोडलें आम्हांसी । म्हणोनि तो शूद्र सांगतसे ॥४०॥


नानापरीनें स्त्री-पुत्रांसी । संबोखीतसे शूद्र अति हर्षीं । इष्‍टवर्ग बंधुजनासी । येणेंचि रीतीं सांगतसे ॥४१॥


समस्त राहिले निवांत । ऐसे आठ दिवस क्रमीत । वारा वाजला अति शीत । ग्रामींचें पीक नासलें ॥४२॥


समस्त राष्‍ट्रींचें पीक देखा । शीतें नासलें सकळिका । पर्जन्य पडिला अकाळिका । मूळनक्षत्रीं परियेसा ॥४३॥


ग्राम राहिला पिकेंवीण । शूद्रशेत वाढलें दशगुण । वाढले यावनाळ सगुण । एकेका अकरा फरगडेंसीं ॥४४॥


पीक झालें अत्यंत । समस्त लोक विस्मय करीत । देश राहिला स्वभावें दुष्कृत । महदाश्चर्य जहालें देखा ॥४५॥


ते शूद्रस्त्री संतोषोनि । शेता आली पूजा घेऊनि । अवलोकीतसे आपुले नयनीं । महानंद करीतसे ॥४६॥


येऊनि लागे पतीचे चरणीं । विनवीतसे कर जोडूनि । बोले मधुर करुणावचनीं । क्षमा करणें म्हणतसे ॥४७॥


अज्ञानमदें अति वेष्‍टिलें । नेणतां तुम्हांसी अति निंदिलें । श्रीगुरु कैंचा काय ऐसें म्हणितलें । क्षमा करणें प्राणेश्वरा ॥४८॥


ऐसें पतीसी विनवोनि । शेतींचे पांडवांसी पूजोनि । विचार करिती दोघेजणी । श्रीगुरुदर्शना जावें आतां ॥४९॥


म्हणोनि सर्व आयतीसीं । पूजों आलीं श्रीगुरुसी । स्वामी पुसती तयांसी । काय वर्तमान म्हणोनियां ॥५०॥


दोघेंजण स्तोत्र करिती । जय जया शिवमुनि म्हणती । कामधेनु कुळदैवती । तूंचि आमुचा देवराया ॥५१॥


तुझें वचनामृत आम्हां । चिंतामणिप्रकार महिमा । पूर्ण जाहलें आमुचें काम्य । शरण आलों तुज आजि ॥५२॥


'भक्तवत्सल' ब्रीद ख्याति । ऐसें जगीं तुज वानिती । आम्हीं देखिलें दृष्‍टांतीं । म्हणोनि चरणीं लागलीं ॥५३॥


नाना प्रकारें पूजा आरती । शूद्र-स्त्री करीतसे भक्तीं । श्रीगुरु संतोषले अतिप्रीतीं । म्हणती लक्ष्मी अखंड तुझे घरीं ॥५४॥


निरोप घेऊनि दोघेंजण । गेलीं आपुले आश्रमासी जाण । करितां मास काळक्रमण । पीक जाहलें अपार ॥५५॥


गतसंवत्सराहूनि देखा । शतगुण जाहलें धान्य अधिका । शूद्र म्हणतसे ऐका । अधिकारियासी बोलावोनि ॥५६॥


शूद्र म्हणे अधिकारियासी । पीक गेलें सर्व गांवासी । रिता दिसतसे कोठारासी । आपण देईन अर्ध वांटा ॥५७॥


गतवत्सर-द्विगुण तुम्हांसी । अंगीकृत होय परियेसीं । धान्य जाहलें बहुवसीं । शताधिकगुण देखा ॥५८॥


देईन अर्ध भाग मी संतोषीं । संदेह न करा हो मानसीं । अधिकारी म्हणती तयासी । धर्महानि केवीं करुं ॥५९॥


गुरुकृपा असतां तुजवरी । पीक जाहलें बहुतापरी । नेऊनियां आपुले घरीं । राज्य करीं म्हणती त्यासी ॥६०॥



संतोषोनि शूद्र देखा । विप्रांसी वांटी धान्य अनेका । घेऊनि गेला सकळिका । राजवांटा देऊनि ॥६१॥


सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र-महिमा परियेसीं । दृढ भक्ति असे सदा ज्यासी । कैंचें दैन्य तया घरीं ॥६२॥


सकळाभीष्‍ट तयासी होती । लक्ष्मी राहे अखंडिती । श्रीगुरुसेवा भावभक्तीं । म्हणे सरस्वती-गंगाधर ॥६३॥


इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शूद्रवरप्रदानं नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः ॥४७॥


श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


( ओंवीसंख्या ६३)




Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.