वासुदेव / आंधळे आणि पांगळे | Vasudev / Andhale ani Pangale | Bhajani malika

shreyash feed ads 2

 ]] हरिः  ॐ [[

]] श्री विठ्ठल रुक्मिणी प्रसज्ञ [[

माझी माऊली अँप डाउनलोड करा 👉  Download

माझी माऊली whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा👉🏻 Join 

( वासुदेव / आंधळे आणि पांगळे ) 

( Vasudev / Andhale ani Pangale )

संपूर्ण  वारकरी भजनी मालिका | Varkari Bhajani Malika in marathi 




भजनी मालिका (पाचवी/सहावी) 

 ***॥ मालिका पाचवी ॥ ***

( Bhajani Malika Pachavi )

 ॥ वासुदेव  ॥ (vasudev)

            ५८. बाबा अहंकार निशी घनदाट । गुरूवचनी फुटली पहाट । माता भक्ति भेटली बरवंट । तिने मार्ग दाविला चौखट गा ॥१ ॥ नरहरी रामा गोविंदा वासुदेवा ॥धृ .॥ एक बोल सुस्पष्ट बोलावा । वाचे हरि हरि म्हणावा । संत समागमु धरावा । तेणें ब्रह्मानंद होय आघवा गा ॥२ ॥ आला शीतळ शांतीचा वारा । तेणें सुख झाले या शरीरा । फिटला पातकांचा थारा । कळीकाळासी धाक दरारा गा ॥३ ॥ अनुहात वाजती टाळ । अनुक्षीर गीत रसाळ । अनुभव तन्मय सकळ । नामा म्हणे केशव कृपाळु गा ॥४ ॥ 


            ५ ९ . बाबा ममतानिशी अहंकार दाट । रामनामें वासुदेवी वाट । गुरूकृपे वोळले वैकुंठ । तेणे वासुदेवो दिसे प्रगट गा ॥१ ॥ वासुदेवा हरि वासुदेवा । रामकृष्ण हरि वासुदेवा ॥धृ.॥आला पुंडलिक भक्तराज । तेणे केशव वोळला सहज । दिधले विठ्ठल मंत्रबीज । तेणे जाले सकळही काज गा ॥२ ॥ रामकृष्ण वासुदेवें । वैष्णव गाताती आघवे । दिंडी टाळ प्रेमभावे । वासुदेवी मन सामावे गा ॥३ ॥ शांतिक्षमादयापुरी । वासुदेवो घरोघरी । आनंद ओसंडला अंबरी । प्रेमे डुल्ले त्रिपुरारी गा ॥४ ॥ वासुदेवी ज्ञेय ज्ञान । ध्यानी मनी नारायण । वासुदेवो परिपूर्ण । कैसे क्षरलेसे चैतन्य गा ॥५ ॥ वासुदेवो वाहूनि टाळी । पातके गेली अंतराळी । सुदेवो वनमाळी । कीर्तन करूं ब्रह्ममेळी गा।।६ ।। ज्ञानदेवी वासुदेवीं । प्रीति पान्हा उजळी दिवी । टाळ चिपळी धरूनि जीवीं । ध्यानमुद्रा महादेवीं गा ॥७॥ 


            ६०. घुळघुळा वाजती टाळ । झणझणां नाद रसाळ । उदो जाला पाहाली वेळ । उठा वाचे वदा गोपाळ ॥१ ॥ कैसा वासुदेव बोलतो बोल । बाळा पोटी माय रिघेल । मेले माणुस जीत उठविल । वेळ  काळाते ग्रासील ॥ आतां ऐसेचि अवघे जन होते जाते तयापासून । जगी जग झाले जनार्दन उदो प्रगटला बिंबले भान ॥३ ॥ टाळा टाळी लोपला नाद । अंगोअंगी मुराला छंद । भोग भोगितांचि आटला भेद । ज्ञान गिळूनि गावा गोविंद ॥४ ॥ गांवा आंत बाहेर हिंडे आळी । देवो देवीची केली चिपुळी । चरण नसता वाजे धुमाळी । ज्ञानदेवाची कांति सावळी ॥५ ॥


             ६१. वासुदेव स्मरण पापहरणाचे मूळ । तीर्थांचे माहेर ब्रह्मव्यापक निश्चळ । अघनाशी मुखीं स्मरता वाचा झाली निर्मळ । त्रिविधताप शोषुनी रूपी स्वरूपी सुमंगळ ॥१ ॥ ॐ नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा है ॥धृ .॥ जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे । तीर्थ व्रत यम नेम नलगे दैवता धरणे।आसनमुद्रा ज्ञान ध्यान नलगे वाराणसी मरणे । केशव माधव अच्युत वदतां होय पातक हरणे॥२॥शरीर शोषण प्राण निरोधन मनोजय हटयोग । गुदपीडन कुंडलिनी कलिमलदल भंग । ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडोनी करि वो वनभंग । ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षु दंग ॥३ ॥ मनोजय वासना तोडोनी केली बीमोडी । मनीपूर नगर पहातां दुर्गति मोडी । काम क्रोध मद मत्सर अहंकार झोडी । अखंड परमानंद सेवूनि उभवी गुढी ॥४ ॥ भेदभाव तोडोनियां घेतला प्रेमाचा गरळा । शुध्द नाम श्रीहरिचे निजमुखी लागला चाळा । हरिस्मरणाचेनी बळे अंकित केले वासुदेव कळिकाळा । एका जनार्दनी अखंड सुखसोहळा ॥५ ॥ 


            ६२. वासुदेव स्मरणे तुटती जन्ममरण व्याधी । अहं सोहं कोहं मूळ ह्या सांडी उपाधी ॥१ ॥ रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा । जन्म जरा तुटे वाचे आठवित सांठवा ॥धृ .॥ चिपळ्या टाळ घुळघुळा शब्द नादे । तेणे ब्रह्मानंद हृदयीं आठवण नांदे ॥३ ॥ एका जनार्दनी वासुदेव चिंतिता । यम काळ दूत पळती नाम ऐकता ॥४ ॥


    `         ६३. सुख दुःख समान सकल जीवांचा कृपाळ । रता ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कल्लोळ ॥१ ॥ धन्य रूपी जगी तोचि एक हरिरंगी नाचे । रामकृष्ण वासुदेव वा सदा स्मरे वाचे ॥२ ॥ विषयी विरक्त जया नाही  आपपर । संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार ॥३ ॥ न जाणीव शहाणीव वोझें सांडोनिया दुरी । आपण तां वस्तीकर वर्ततसे संसारी ॥४ ॥ एका जनार्दनी नित्य न हरीचे कीर्तन । आसनी शयनीं सदा हरीचें चिंतन।।५ ।।


             ६४. जया परमार्थी चाड । तेणें सांडावे लिगाड । 1 धरूनि भजनाची चाड । नित्यनेम आदरें ॥१ ॥ सांडी ना मांडी परते टाकी । वासुदेव नाम घोकी । मोक्ष येईल सुखीं । नाम स्मरतां आदरें ॥२ ॥ रामकृष्ण वासुदेवा । धरी हाचि दृढ भावा । आणिकाचा हेवा । दुरी करी आदरें ॥३ ॥ घाली संतासी आसने । पूजा करी काया वाचा मनें । एका जनार्दनी जाणे । इच्छिले तें पुरवी ॥४ ॥

    

             ६५. मी वासुदेव नामे फोडितो नित्य टाहो । देखिले पाय आतां मागतो दान द्या हो । सावळे रूप माझ्या मानसी नित्य राहो । पावन संतवृंदे सादरे दृष्टि पाहो।।१ ।। रामकृष्ण वासुदेवा । हरी रामकृष्ण वासुदेवा ॥धृ.॥सांडोनि सर्व चिंता संतपदी लक्ष लागो । मुक्त मी सर्वसंगी सर्वदा वृत्ति जागो । भाविक प्रेमळांच्या संगती चित्त लागो ॥२ ॥ अव्दैतेचि चालो अक्षयी भक्तियोग । स्वप्नीही मानसाते नातळो व्दैतसंग । अब्दयानंद वेधे नावडो अन्य भोग । अक्रियत्वचि वाहो सत्क्रिया रूप बोध ॥३ ॥ पहाता विश्व माते निजरूप दाखवी । सत्कथा श्रवण की पीयूष चाखवी । रसने नाममंत्र सर्वदा प्रेम देई । तोषला देवराणा म्हणे बारे घेई ॥४ ॥ हे दान पावले सद्गुरू शांतिलिंगा । हे दान ठेवा पावले आत्मया पांडुरंगा । हे दान पावले व्यापक अंतरंगा जाणा । हे दान पावले एका जनार्दनी दोष जाती भंगा ॥५ ॥ 

            ६६. गातो वासुदेव मी ऐका । चित्त ठायी ठेवूनि सर्व भावे एका । डोळे झांकूनि रात्र करूं नका । काळ करीत बैसलासे लेखा गा ॥१ ॥ राम राम स्मरा आधी । लाहो करा गांठ घाला मूळबंदी । सांडा वाउगिया उपाधी । लक्ष लावूनि राहा गोविंदी गा ॥२ ॥ अल्प आयुष्य मानव देह । शत गणिलें ते अर्ध रात्र खाय । मध्ये बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासी उरलें ते पाहे गा ॥३ ॥ क्षणभंगुर नाहीं भरंवसा । व्हारे सावध तोडा माया आशा । कांहीं न चले मग गळा पडेल फांसा । पुढे हुशार थोर आहे ओळसा गा ॥४ ॥ कांहीं थोडा बहुत लागपाठ । करा भक्तिभाव धरा बळकट । तन मन ध्यान द्या लावूनियां नीट । जरी करणे असेल गोड शेवट गा ॥५ ॥ विनवितों सकळां जना । कर जोडोनि थोरा लहाना । दान इतुकेंचि द्या मज दीना । म्हणे तुकयाबंधु राम म्हणा गा ॥६ ॥ 


            ६७. राम राम दोनी अक्षरें । सुलभ आणि सोपारें । जागा मागिलीया पहारे । शेवटीचे गोड तेचि खरें गा ॥१ ॥ रामकृष्ण वासुदेवा । जाणवी जनासी वाजवी चिपळीया । टाळ घागऱ्या घोषे गा ॥२ ॥ गाय वासुदेवा वासुदेव । भिन्न नाही आणिका नांवा । दान जाणोनिया करी हावा । न ठेवी उरी कांहीं ठेवा गा ॥३ ॥ नीज घेउनियां फिरती । एक वेळा जाणविती । धरूनियां राहा चित्तीं । नेघे भार सांडी कामा हाती गा ॥४ ॥ सुपात्री सर्व भाव । मी तो सर्व वासुदेव । जाणती कृपाळू संत महानुभाव । जया भिन्न भेद नाहीं ठावा गा ॥५ ॥ शूर दान जीवें उदार । नाहीं वासुदेवी विसर । कीर्ति वाढे चराचर । तुका म्हणे तया नमस्कार गा ॥६ ॥


             ६८. रामकृष्ण गीतीं गात । टाळ चिपळ्या वाजवित । छंदे आपुलिया नाचत । निज घेऊनि फिरत गा ॥१ ॥ जनीं वनीं अवघा देव । वासनेचा पुसावा ठाव । मग वोळगा तो वासुदेव । ऐसा मनीं वसू द्या भाव गा ॥२ ॥ निज नामाची थोर आवडी । वासुदेवासी लागली गोडी । मुखीं नाम उच्चारी घडोघडी ।  ऐसी करा वासुदेवी जोडी गा ॥३ ॥ अवघा सारूनि शेवट झाला । प्रयत्न न चले कांहीं केला । जागा होई सांडूनि झोपेला । दान देई वासुदेवाला गा ॥४ ॥ तुका म्हणे धन्य त्याचे जिणें । जिहीं वासुदेवीं घातलें दान । तया न लगे येणे जाणे।झाले वासुदेवीं राहणे गा ॥५ ॥ 


            ६९ . बोल बोले अबोले । जागे बाहेर आंत निजेले । ' कैसें घरांत घरकुल केले । नेणो अंधार ना उजेडले गा ॥१ ॥ वासुदेव करितो फेरा । वाडियांत बाहेर दारा । कोणी काही तरी दान पुण्य करा । जाब न द्याल तरी जातो माघारा गा ॥२ ॥ हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे । गजर होतो बहु मोठ्यानें । नाहीं निवडिली थोर लहानें । नका निजो भिकेच्या भेणे गा ॥३ ॥ मी वासुदेव तत्वतां । कळो येईल विचारितां । आहे ठाउका सभाग्य संतां । नाहीं दुजा आणिक मागता गा ॥४ ॥ काय जागाची निजलासी । सुनें जागवूनि दारापासी । तुझ्या हितासाठी करी वसवसी । भेटी न घेसी वासुदेवासी गा ॥५ ॥ ऐसे जागविले अवघे जन । होतें संचित तिहीं केले दान । तुका म्हणे दुबळी कोण कोण । गेली वासुदेवासी विसरून गा ॥६ ॥


             ७०. विषय सेवितां गा जन्ममरणाचा बाधु । विवेक गुरूवाक्य छेदी भवबंधु ॥१ ॥ रामकृष्ण वासुदेव हरि ब्रह्मानंदे गळती गा । रामकृष्ण वासुदेव हरि देही विदेही झाला गा ॥२ ।। गुरूवाक्य भावबळे निजबोधे पै बुध्दि । तेणे बोधे पाहतां गा अखंड ते समाधि ॥३ ॥ जनी वनी निरंजनी वासुदेव समान । एका जनार्दनी चित्त चैतन्यघन ॥४ ॥ 


            ७१. गेले टळले प्रहर तीन । काय निजसुरा निजसी अझूनि । जागे होऊनि कांहीं करा दान । नका झांकुं ऐकोनि लोचन गा ॥१ ॥ हरे रामकृष्णा । वासुदेव जाणवितसे जना । चिपळ्या टाळ हातीं विणा । मुखी घोष नारायणा गा ॥२ ॥ जे ठाकेल कोणा कांहीं । फळ पुष्प अथवा तोयी । द्या परी मीस घेऊ नका भाई । पुढें विन्मुख होता बरे नाहीं गा ॥३ ॥ देवाकारणें भाव तस्मात । द्यावें न लगे फारसें वित्त । झालें एक चित्त तरी बहुत । एवढ्यासाठी नका करूं वाताहात गा ॥४ ॥ आलो येथवरी बहु सायास । करितां दान हेंचि मागावयास । नका भार घेऊ करूं निरास । धर्म सार फळ संसारास गा ॥५ ॥ आतां मागुता येईल फेरा । हे तो न घडे या नगरा । म्हणे तुकयाबंधु भाव धरा । ओळखी नाहीं तरी जाल अघोरा गा ॥६ ॥ 


            ७२.कर जोडूनि विनवितो तुम्हा । नका करू संसारश्रमा । नका गुंतू विषयकामा । तुम्ही आठवा मधुसूदना ॥१ ॥ रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा ॥धृ .॥ नरदेह दुर्लभ जाणा । शत वर्षाची गणना । त्यामध्ये दुःख यातना । तुम्ही आठवा मधुसूदना ॥२ ॥ नलगे तिर्थांचे भ्रमण । नलगे दंडण मुंडण । नलगे पंचाग्नी साधन । तुम्ही आठवा मधुसूदना ॥३ ॥ हेचि माझी विनवणी । जोडोनिया कर दोन्ही । शरण एका जनार्दनी । तुम्ही वासुदेव म्हणा अनुदिनी ॥४ ॥


             ७३. मनु राजा एक देहपुरी । असे नांदतु त्यासी दोघी नारी । पुत्रपौत्र संपन्न भारी । तेणे कृपा केली आम्हांवरी गा॥शाम्हणऊनि आलो या देशा । होतो नाही तरी भुललो दिशा । दाता तो मज भेटला इच्छा । येऊनि मारग दाविला सरिसा गा ॥२ ॥ सवे घेउनि चौघेजण । आला कुमर सुलक्षण ।कडे चुकवूनि कांटवण । ऐका आणिली ती कोण कोण गा ॥३ ॥ पुढे भक्तिने धरिले हाती । मागे ज्ञान वैराग्य धर्म येती । स्थिर केली जी अचपळे होती । सिध्द आणुनि लाविली पंथी गा ॥४ ॥ केले उपकार सांगो काय । बाप न करी ऐसी माय । धर्मे त्याच्या हे देखियेले पाय । दिले अक्षय अभयदान गा ॥५ ॥ होतो पीडत हिंडता गाव । पोट भरे ना राहावया ठाव । तो येणे अवघा संदेह । म्हणे फेडियेला तुकयाचा बांधव गा ॥६ ।। 


            ७४. ओले मृतिकेचे मंदिर । आंत सहा जण उंदीर । गुंफा करिताती पोखर । यांचा नका करूं अंगिकार गा ॥१ शावासुदेव करितो फेरा । तूं अद्यापि कां निदसुरा । सावध होई रे गव्हारा । भज भज तूं शारंगधरा गा ॥२ ॥ बा तुझे तूं सोयरे । तूंचि वडील बा धारे । तूं तुझेनि आधारे । वरकड मिळाले ते अवघे चोर गा ॥३ ॥ वासुदेव फोडितो टाहो । उठी उठी लवलाहो । हा दुर्लभ मानव देहो।म्हणे तुकयाबंधू स्वहित लवलाहो गा ॥४ ॥ 


            ७५. ॐ नमो भगवते वासुदेवाया । व्दादशाक्षरी मंत्रु न जपसी काहा ॥धृ .॥ वोडियाणा बंध घालुनि देहूडा लागसील पावो । वोतप्रोत सांडूनि मना धरिसी अहंभावो । ओंकारबिंदूचा न पवसी ठावो । वोळगे वोळगे कृष्ण व्दारावतीये रावो ॥१ ॥ नागिणी उत्साहे नवहि व्दारें निरोधून । नाडियामाजी सुषुम्ना संचरण । न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन । नरहरी चिंतनें अहर्निशी मुक्तिस्थान ॥२ ॥ मोडिसी करचरण तेणे पावसी अंत समो । मोहो तृष्णा न तुटे ब्रह्मविद्या केवी गमो । मोठा हा अन्यावो जे हरिचरणीं नाहीं नमो । मोक्षाची चाड तरी मुकुंदी मन रमो ॥३ ॥ भांबावसी झणे हे शरीर कर्दळीस्तंभ । भस्म कृमि विष्ठा उभे आहे तो सुशोभ । भाविता कीटकी झाली भंगी तिया क्रमिले नभ । भावें भक्ति सुलभ वोळगा वोळगा पद्मनाभ ॥४ ॥ गति मति इंद्रिये जव आहेती समयोग । गणिता आयुष्य न पुरे जंव हे न वचे भंग । गमला हाचि योग जे अनुसरावा श्रीरंग । गरूडध्वजप्रसादें निस्तरिजे भवतरंग ॥५ ॥ वनी सिंह वसतां गजी मदु केवीं धरावा । वन्हिदग्धबीज त्यासी अंकुर केवीं फुटावा । व्रजपाणी कोपलिया गिरी उदधि केवीं लंघावा । वदनी हरि उच्चारी तेणें संसार केवीं भुंजावा ॥६ ॥ तेज नयनीचा भानु जेणें तेजे मीनले ते त्याचे मानसीचा चंद्रमा तो सिंपाते अमृत । त्याचे नाभिकमळी ब्रह्मा तेणें सृजिली सकळही भूतें । तें विराट स्वरूप ओळखावें विष्णुभक्तं ॥७ ॥ वाताघाते फुटे गगनी मेघाचा मेळावा । वारीबिंदू पद्मिणिपत्री के वीं हो ठेवावा । वानराच्या हाती चिंतामणि केवीं द्यावा । वासुदेव चिंतने तोचि कल्मषा उठावा ॥८ ॥ सूक्ष्म स्थूल भूतें चाळिता हे परमहंसू । कि शूळपाणी देवोदेवी जयाचा रे अंशु । शुभाशुभी कर्मी न करी नामाचा आळसु । सुखें निरंतरी ध्याई ध्याई हृषीकेशु ॥९ ॥ देव देऊनि उदार भक्तां देतो अमरपदे । देता न म्हणे सानाथोर वैरियासी तेचि दे । देहे सार्थक अंती वासुदेव आद्य छंदे । देखा अजामेळ उध्दरिला नामें येणें मुकुंदें ॥१० ॥ वाडा सायासी मनुष्य जन्म पावावा । वियाला पुरूषार्थ तो कां वायां दवडावा । वाचा मने करूनि मुरारी वोळगावा । व्रतें एकादशी करूनि परलोक ठाकावा ॥११ ॥ या धनाचा न धरी विश्वास जैसी तरूवर छाया । यातायाती न चुके तरी हे भोगसील काह्या । या हरिभजनेवीण तुझे जन्म जाते वायां । यालागी वैकुंठनाथाच्या तूं चिंती पा रे पायां ॥१२ ॥ इहीच व्दादशाक्षरी ध्रुव अढळपद पावला । प्रल्हाद रक्षिला अग्निशस्त्रापासूनि जळा । बापरखुमादेवीवरू विठ्ठलु तुम्ही ध्यारे वेळोवेळां । तो कळिकाळांपासूनि सोडवील अवलीला ॥१३ ॥



***॥ मालिका सहावी ॥ ***

( Malika Sahavi )

----| आंधळे आणि पांगळे |----

( Aandhale ani Pangale )

            ७६. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारलें । विषयसुख नाशिवंत सेवितां तिमिर कोंदले । चौऱ्यांशी लक्ष योनी फिरता दुःख भोगिलें । ज्ञान दृष्टि हारपली दोन्ही नेत्र आंधळे ॥१ ॥ धर्म जागो सदैवांचा जे बा परउपकारी । आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नांव मी उच्चारी ॥२ ॥ संसार दुःखमूळ चहूंकडे इंगळ । विश्रांती नाहीं कोठे रात्रंदिवस तळमळ । कामक्रोध लोभ शुनी पाठी लागली ओढाळ । कवणा मी शरण जाऊं आतां दृष्टि देईल निर्मळ ॥३ ॥ माता पिता बंधु बहिणी कोणी न पवती निर्वाणी । इष्टमित्रस्वजनसखे हे तो सुखाची मांडणी । एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी । तेथें कोणी सोडविना एका सद्गुरू वांचूनि ॥४ ॥ साधुसंत मायबाप तिहीं केले कृपादान । पंढरिये यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान । पुंडलिके वैद्यराजे पूर्वी साधिले साधन । वैकुंठीचे मूळपीठ डोळां घातले अंजन ॥५ ॥ कृष्णांजन एक वेळा डोळां घालितां अढळ । तिमिर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ । श्रीगुरू निवृत्तिरायें मार्ग दाविला सोज्वळ । बापरखुमादेवीवरू विठ्ठल दीनाचा दयाळ ॥६ ॥


             ७७. देवा तुज चुकलो गा तेणे दृष्टि आले पडळ । विषय ग्रंथी गुंतलासे तेणें होतसे विव्हळ । अंधमंद दृष्टि झाली गिळू पाहे हा काळ । अवचित दैवयोगे निवृत्ति भेटला कृपाळ ॥१ ॥ धर्म जागो निवृत्तीचा तेणे फेडिले पडळ । ज्ञानाचा निजबोधु विज्ञानरूप सकळ।।२ ॥ तिही लोकी विश्वरूप दिव्य दृष्टि दिधली । व्दैत हे हरपले अव्दैतपणे माउली । उपदेशु निजब्रह्म ज्ञानांजन साउली । चिद्रुप दीप पाहे तेथें तनुमनु निवाली ॥३ ॥ दान हेंचि आम्हां गोड देहीं दृष्टि मुराली । देह हे हरपले विदेहवृत्ति स्फुरली । विज्ञान हे प्रगटले ज्ञेय ज्ञाता निमाली । दृश्य ते तदाकार ममता तेथें बुडाली ॥४ ॥ प्रपंचु हा नाहीं जाणा एकाकार वृत्ति जाली । मी माझे हरपले विषयांध या बोली । उपरती सद्गुरू बोधु तेथें प्रकृति संचली । धर्ममार्ग सिध्द पंथ हाती काठी दिधली ॥५ ॥ वेदमार्गे मुनि गेले त्याचि मार्गे चाललो । न कळेचि विषयअंधा म्हणोनि उघड बोलिलों । चालतां धनुर्धरा तरंगाकारी हारपलो । ज्ञानदेवो निवृत्तीचा व्दैत सर्व निरसलों ॥६ ॥


             ७८. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम । पांडुरंग दीनबंधु जयाचे ते नाम ॥१ ॥ आंधळ्या जीवीचे तो जाणतो धर्म । म्हणोनि आलो गा देई माझे मज वर्म ॥धृ .॥ असोनि हातपाय डोळे जाहलो मी आंधळा । मुखी नाम तुझे लागला वाचेसी चाळा ॥२ ॥ देऊनि दान - माते नाम सांगे ये काळी । विठोबाचे  दान आले ऐसी देईन आरोळी ॥३ ॥ दान पावले संत संगें भक्तिचें । एका जनार्दनीं अखंड नाम वाचें ॥४ ॥ 


            ७९ . मृत्यूलोका माझारी गा एक सद्गुरू दातारू । त्याचेनि गा दर्शनें तुटला हा संसारू । पांगुळा हस्त कृपाळु उदारू । यालागी नांव त्याचें वेदा न कळे पारू ॥१ ॥ धर्माचें वस्ति घर ठाकियले बा आम्हीं । दान मागों ब्रह्म रसाचें नेघों व्दैत या उर्मी ॥धृ .॥ विश्रांती विजन आम्हां एक सद्गुरू दाता । सेविता चरण त्याचे फिटली इंद्रियांची व्यथा । निमाली कल्पना आशा इळा परिसी झगडतां । कैवल्य देह झालें उपरती देह अवस्था ॥२ ॥ मन हे निमग्न झाले चरणस्पर्शे तत्वतां । ब्रह्माहं स्फूर्ति आधीं भावो उमटला उलथा । पांगुळलें गुह्य ज्ञान ब्रह्मरूपें तेथें कथा । अंध मग दृढ झालों निमाल्या विषयाच्या वार्ता ॥३ ॥ रिध्दीसिध्दी दास्य सख्य आपोआप वोळलीं । दान मान मंद बुध्दी ब्रह्मरूपें लीन झालीं । वोळली कामधेनु पंगु तनु वाळली । पांगळा जीवन मार्ग सतरावी ही वोळली ॥४ ॥ मी माझे कल्पनेने पंगु झालो पै मने । वृत्ती हे हरपली एका सद्गुरूरूप ध्यानें । निवृत्तीसी कृपा आली शरण गेलों ध्येय ध्यानें ॥५ ॥


             ८०. मृत्यूलोकीं एक नगर त्याचे नांव पंढरपूर । तेथील मोकाशी उभा असे विटेवर । पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागातीर । बोलती साधुसंत जीवा वाटे हुरहुर ॥१ ॥ तुम्ही संत मायबाप एवढा उपकार करा | न्या मज तेथवरी दाखवा दीनांचा सोयरा ॥धृ ॥ मज नाहीं हात पाय डोळां पडली झापड । कर्ण है । बधिर झाले वाचा बोले बोबड । नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबुड । श्वानापरी गती जाली अवघे करिती हाडहाड ॥२ ॥ साधुसंत मायबाप जे कां दयेचे सागर । भावाचे मुख्य स्थान भक्तिचे माहेर । तिही केले कृपादान मस्तकी ठेविला कर । माया मोह निरसली शुध्द जाले कलेवर ॥३ ॥ बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला नीट । भ्रांती हे समूळ गेली दिसू लागली वाट । नाचत प्रेमछंदे चालू लागलो सपाट । एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ ॥४ ॥ 


            ८१. मी माझे कल्पनेने जाहलोसें पांगूळ । चालता न चलवेचि कोठे न मिळे स्थळ । हिंडलों दिशा दाही श्रम जाहला केवळ । कवण ही भ्रांती वारी कै भेटेल गुरूदयाळ।।१ ॥ धर्म जागो गुरूमहिमा देही दाविला देव । निवारूनी भवर जाळे अवघा निरसला भेव॥धृ .॥ कर्म त्या अकर्माच्या लागती वाटे ठेसा । संपत्ती विपत्तीचा मानिला भरवंसा । कन्या पुत्र आप्त जन हा तो सहज वोळसा । या भ्रमडोहीं बुडालों धांवें गुरूराया सर्वेशा॥२॥येउनी गुरूनाथें माथां ठेविला कंरू । अज्ञानतिमिर गेलें शुध्द मार्ग साचारू । गर्जत चालियेलों फिटला अज्ञान अंधारू । एकाजनार्दनीं माझा श्रीगुरू उदारू ॥३ ॥  

                  

            ८२. जंबुया व्दीपामाजी एक पंढरपूर गांव । धर्माचे  नगर देखा विठो पाटील त्याचे नांव । चला जाऊं तया ठाया कांहीं भोजन मागाया ॥१ ॥ विठोबाचा धर्म जागो । त्याचे चरणी लक्ष लागो ॥धृ .॥ ज्यासी नाहीं पंखपाय तेणे करावे ते काय । शुध्द भाव धरोनियां पंढरीसी जाय । इच्छिलें फळ देतो यासी नवलाव तें काय ॥२ ॥ सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्रे पीडीला । मुष्टि पोहे घेउनी त्याचे भेटीलागी गेला । शुध्द भाव देखोनियां गांव सोनियाचा दिला ॥३ ॥ गण आणि गोत्रज सर्व हांसताती मज । गेले याचे मनुष्यपण येणे सांडियेली लाज । विनवितो शिंपी नामा संत चरणीचा रज ॥४ ॥


             ८३. पांगुळ झालों देवा नाही हात ना पाय । बैसलो जयावरी सैराट ते जाय । खेटितां कुंप कांटी खुंट दरडी न पाहे । आधार नाहीं मज कोणी बाप ना माय ॥१ ॥ दाते हो दान करा जाते पंढरपुरा । न्या मज तेथवरी अखमाचा सोयरा ॥धृ .॥ हिंडता गव्हाणे गा शिणलों येरझारी । न मिळेचि दाता कोणी जन्मदुःख निवारी । कीर्ति हे संतांमुखीं तोचि दाखवा हरी । पांगुळा पाय देतो नांदे पंढरपुरी ॥३ ॥ या पोटाकारणे गा झालों पांगिला जना । न सरेचि मायबाप भीक नाहीं खंडणा । पुढारा म्हणती एक तया नाहीं करूणा । श्वान हे लागे पाठी आशा बहु दारूणा ॥४ ॥ काय मी चुकलों गा मागे नेणवेचि कांहीं । न कळेचि पापपुण्य येथे आठव नाहीं । मी माजी भुललों गा दीप पतंगा सोयी । द्या मज जीवदान संत महानुभाव कांहीं ॥५ ।। दुरोनी आलों मी गा दुःख झालें दारूण । यावया येथवरी होतें हेंचि कारण । दुर्लभ भेटी तुम्हां पायीं झालें दरूषण । विनवितो तुका संतां दोन्ही कर जोडून ॥६ ॥


             ८४. देखत होतों आधी मागे पुढे सकळ । मग हे दृष्टि गेली वर आले पडल । तिमिर कोंदलेसे वाढे वाढतां प्रबळ । भीत मी झालों देवा काय ज्याल्याचे फळ ॥१ ॥ आतां मज दृष्टि देई पांडुरंगा मायबापा । शरण मी आलों तुज निवारूनियां पापा । अंजन लेववूनी करी मारग सोपा । जाईन सिध्दपंथें अवघ्या चुकतील खेपा ॥२ ॥ होतसे खेद चित्ता कांही नाठवे विचार | जात होतो जनामागें तोही सांडिला आधार । हा ना तो ठाव झाला अवघा पडिला अंधार । फिरली माझी मज कोणी न देती आधार ॥३ ॥ जोवरी चळण गा तोंवरी म्हणती माझा । मानिती लहानथोर देहसुखाचिया काजा । इंद्रिये मावळली आला बागुल आजा । कैसा विपरित झाला तोचि देह नव्हे दुजा ॥४ ॥ गुंतलो या संवसारें कैसा झालोंसे अंध । मी माझें वाढवूनी मायातृष्णेचा बाध । स्वहित न दिसेचि केला आपुला वध । लागले काळ पाठीं सवें काम हे क्रोध ॥५ ॥ लागती चालतां गा गुणदोषांच्या ठेसा । सांडिली वाट मार्ग झालों निराळा कैसा । पाहतो वाट तुझी थोर करूनी आशा । तुका म्हणे वैद्यराजा पंढरीच्या निवासा ॥६ ॥


             ८५. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथें । वृत्ति हे निवृत्ति झाली जन न दिसे तेथें । मी माझे हारपलें ठायीं जेथीच्या तेथे । अदृश्य तेचि झाले कांहीं दृश्य जे होते ॥१ ॥ सुखे मी निजलो गा शून्य सारूनि तेथे । त्रिकुट शिखरी गा दान मिळे आइतें ॥२ ॥ टाकिली पात्र झोळी धर्म अधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणांचा वोळसा । न मागे भीक आतां हाचि झाला भरवंसा । वोळली सत्रावी गा तिणे पुरविली इच्छा ॥३ ॥ ऊर्ध्वमुखे आळविला सोहं शब्दांचा नाद । अरूप जागविला दाता घेऊनि छंद । घेऊनि आला दान निजतत्व निजबोध । स्वरूपी मेळविले नांव ठेवियला भेद ॥४ ॥ शब्द हा बहुसार उपकाराची राशी । म्हणोनि चालविला मागे येतील त्यांसी । मागोनी आली वाट सिध्द ओळखीची तैसी । तरले तरती गा आणिकही विश्वासी ॥५ ।। वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव । जाणीव नागवण लागो नेदी ते ठाव । म्हणोनि संग टाकी सेवी अव्दैतभाव । तुका म्हणे हाचि संती मागे केला उपाव ॥६ ॥ 


            ८६. आंधळ्यापांगळ्यांचा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तोचि सर्व होय जाणता । घडी मोडी हळामात्रे पापपुण्यसंचिता । भवदुःख कोण वारी तुजवांचूनि चिंता ॥१ ॥ धर्म गा जागो तुझा तूंचि कृपाळू राजा । जाणसी जीवीचे गा न सांगता सहजा ॥२ ॥ घालती लोळणी गा पुंडलिके वाळवंटी । पंढरी पुण्य ठाव नीरे भीवरे तटीं । न देखे दुसरे गा झाली अदृश्य दृष्टि । वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टि ॥३ ॥ आणिक उपमन्यु एक बाळ धाकुटें । न देखे न चलवे जना चालते वाटे । घातली लोळणी गा हरिनाम बोभाटे । पावला त्या कारणे धांव घातली नेटें ॥४ ॥ बैसोनि खोळी शुक राहे गर्भी आंधळा । शीणला येरझारी दुःख आठवी वेळा । मागील सोसिले ते ना भी म्हणे गोपाळा । पावला त्या कारणे लाज राखिली कळा ॥५ ॥ न देखे जो या जना तया दावी आपण । वेगळा सुखदुःखा मोहो नाठवी धना । आपपर तेही नाही बंधुवर्ग सजना । तुकया तेचि परी झाली पावे नारायणा ॥६ ॥


             ८७. भगवंता तुजकारणे मेलो जीताचि कैचि । निष्काम बुध्दि ठेली चळण नाहीं तयेसी । न चलती हात पाय दृष्टि फिरली कैसी । जाणता न देखो गा क्षर आणि अक्षरासी ॥१ ॥ विठोबा दान दे गा तुझ्या सारिखे नामा । कीर्ती हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥२ ॥ भुक्ति मुक्ति तूंचि एक होसी सिध्दीचा दाता । म्हणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता । सर्वस्वे त्याग केला धांव घातली आतां । कृपादान देई देवा येऊनि सामोरा आतां ॥३ ॥ संसार सागरू गा भवदुःखाचे मूळ । जनवाद अंथरूण माजी केले इंगळ । इंद्रिये वज्रघातें तपे उष्ण वरी ज्वाळ । सोसिले  काय करू दुर्भर हे चांडाळ ॥४ || तिहीं लोकीं तुझे आधळ आणि पांगळे नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंधलो वरी खोडा भाव धरूनि टेका । जाणवी नरनारी जागो धर्म लोका । पावती पुण्यवंत सोई आमुचिये हांका ॥५ ॥ नाठवे आरपर आतां काय बा करूं । सारिखा दोहीसवा हारपला विचारू । घातला योगक्षेम तुज आपुला भारू । तुकया शरणागता देई अभयकरू ॥६ ॥


             ८८. देश वेष नव्हे माझा सहज फिरत आलो । करूं सत्ता कवणावरी कोठे स्थिर राहिलों । पाय डोळे म्हणता माझे तिहीं कैसा मोकलिलों । परदेशी नाहीं कोणी अंध पांगुळ झालों ॥१ ॥ आतां माझी करी चिंता दान देई भगवंता । पाठीपोटी नाहीं कोणी निरवी सज्जन संता ॥२ ॥ चालतां वाट पुढे भय वाटते चित्तीं । बहुत जन गेले नाही आले मागुती । न देखो काय झाले कान तरी ऐकती । बैसलो संधिभागी तुज धरूनि चित्तीं ॥३ ॥ भाकितो करूणा गा जैसा सांडिला ठाव । न भरेचि पोट कधी नाहीं निश्चळ पाव । हिंडता भागलो गा लक्ष चौऱ्यांशी गांव । धरूनि राहिलो गा हाचि वसतां ठाव ॥४ ॥ भरंवसा काय आतां कोण आणी अवचिता । तैसीच झाली कीर्ती तया मज बहुता । म्हणऊनि मारी हाका सोयी पावें पुण्यवंता । लागली भूक थोरी तूंचि कृपाळू दाता ॥५ ॥ संचित सांडवले कांहीं होते ते जवळीं । वित्त गीत पूत माया तूटली हे लागावळी । निष्काम झालो देवा होते माझे कपाळी । तुका म्हणे तूंचि आतां माझा सर्वस्वे बळी ॥६ ॥ 


Majhimauli-blogger







FAIR-USE COPYRIGHT DISCLAIMER


Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.